मूळ कृषि व पदुम विभागात रवानगी
मुंबई : मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयात लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेले राजेंद्र ढेरिंगे यांच्यावरील कारवाईनंतर झिरवाळ यांचे खासगी सचिव रामदास गाडे यांचेही नाव पुढे येऊ लागले आहे. या प्रकरणी मंत्री झिरवाळ यांनी तत्काळ कारवाई करीत रामदास गाडे यांना आपल्या स्वीय सहाय्यक पदावरून कार्यमुक्त केले असून त्यांची रवानगी मूळ विभागात केली आहे. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अन्न व औषध प्रशासन खात्यातील लिपिक राजेंद्र ढेरिंगे याला लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत ३५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. दरम्यान आज ढेरिंगे याला मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एसीबी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्याने झिरवाळ यांचे स्वीय सहाय्यक रामदास गाडे याचे नाव घेतल्याची माहिती आहे. त्यादिवशी गाडे दिल्लीत मंत्री झिरवाळ यांच्याबरोबर असल्याचे सांगितले जात असले, तरी आता झिरवाळ यांनी गाडे यांच्यावरही कार्यवाही केली आहे.
यासंबंधीचे पत्र त्यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आपले खाजगी सचिव डॉ. रामदास गाडे यांना तातडीने पदावरून कार्यमुक्त केले आहे. गाडे हे झिरवाळ यांच्या मंत्रालयात प्रतिनियुक्तीवर होते. पण आता त्यांची सेवा त्यांच्या मूळ विभागात (कृषि व पदुम विभाग) वर्ग करण्यात आली आहे. झिरवाळ यांनी या प्रकरणी सामान्य प्रशासन विभागाला तातडीने आदेश काढण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान मंत्री झिरवाळ यांनी प्रकरणाशी आपला संबंध आढळला तर आपण स्वतःहून राजीनामा देऊ असे स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर झिरवाळ यांनी उपरोक्त कारवाई केली आहे. विरोधकांनीही या प्रकरणी नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
दुसरीकडे मंत्रालयातील लाचखोरीचा एक व्हिडिओ समोर आला होता. हा व्हिडिओ शूट करणाऱ्या निर्मल शर्मा यांनी झिरवाळ यांच्या कार्यालयात पैशांचा कसा व्यवहार चालतो? हे सांगितले होते. त्यांच्या माहितीनुसार, उपरोक्त प्रकरणात मंत्री नरहरी झिरवाळ यांचे खासगी सचिव रामदास गाडे यांचाही समावेश आहे. अन्न व औषध प्रशासन खात्याच्या कार्यालयात येणाऱ्या फाईल्सवर लाल, हिरव्या पट्ट्या मारून त्यावर कुणाला किती पैसे द्यायचे हे विशेष खूण करून लिहिले जायचे. विशेष म्हणजे या मेडिकल सस्पेन्शनच्या सुनावण्या मंत्री घेत नव्हते, तर त्यांचे अधिकारी घेत होते. या प्रकरणी कुणाचीही ओळख सांगितली तरी या विभागात पैसे द्यावेच लागतात, असा आरोप निर्मल शर्मा यांनी केला.