मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागातील लाचखोरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या लिपिक राजू (राजेंद्र) ढेरिंगे याला मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एसीबी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. एसीबीने सापळा रचून अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर लगेचच त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यात आली आणि न्यायालयाने त्याला दिलासा दिला. मंत्रालयातील या कारवाईमुळे काही दिवसांपूर्वी मोठी खळबळ उडाली होती. मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर एसीबीच्या पथकाने सापळा रचून ढेरिंगे याला रंगेहात पकडले होते. औषध दुकानाचा निलंबित परवाना पूर्ववत करण्यासाठी त्याने ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तडजोडीनंतर ३५ हजार रुपये स्वीकारताना त्याला अटक करण्यात आली. कारवाई दरम्यान एसीबीचे अधिकारी थेट मंत्र्यांच्या कार्यालयात पोहोचले होते आणि काही काळ कार्यालय ताब्यात घेण्यात आले होते.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी संबंधित लिपिकाविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्याची प्रतिनियुक्ती तत्काळ रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले असून विभागीय दक्षता पथकाला सखोल चौकशी करण्यास सांगितले आहे. वस्तुनिष्ठ आणि सर्वंकष अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, एसीबीने ढेरिंगे याच्या नाशिक रोड येथील घराची झडती घेतली होती. या झडतीदरम्यान काही महत्त्वाची कागदपत्रे हाती लागल्याची माहिती समोर आली आहे. ढेरिंगे हा मूळचा अन्न व नागरी पुरवठा विभागातील कर्मचारी असून वर्षभरापूर्वी तो अन्न व औषध प्रशासन विभागात प्रतिनियुक्तीवर आला होता आणि मंत्र्यांच्या अपील विभागात कार्यरत होता. ढेरिंगेला जामीन मंजूर झाला असला तरी एसीबीचा तपास सुरूच आहे. घरातून मिळालेली कागदपत्रे, आर्थिक व्यवहार आणि या प्रकरणाचे धागेदोरे आणखी कुठपर्यंत पोहोचतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.