मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या भेटीवर प्रतिक्रिया देताना राजकारणापलीकडे जाऊन संवाद साधण्याची गरज व्यक्त केली आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, दोन नेते भेटले की त्याचा लगेच राजकीय अर्थ काढला जातो, ही चुकीची प्रवृत्ती आहे. निवडणुका संपल्यानंतर राज्याच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करण्यासाठी नेते एकत्र येऊ नयेत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आपल्याकडे निकोप राजकारण राहील नाही कोणाला भेटल की युत्या यावर सुरुवात होते प्रत्येक वेळेला काही शोधलच पाहिजे का? मी उद्या मुख्यमंत्र्यांनाही भेटू शकतो आणि राज्यासमोर असलेल्या विविध समस्यांवर चर्चा करू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे यांनी शहरांमधील वाढती लोकसंख्या, वाहतूक कोंडी आणि पार्किंगचा प्रश्न गंभीर बनल्याचे सांगितले. विकास म्हणजे फक्त रस्ते बांधणे नव्हे, तर वाढत्या शहरी ताणाचा विचार करणेही आवश्यक आहे, असे ते म्हणाले. शहरांची जागा तीच आहे; मात्र लोकसंख्या आणि वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक इमारतींमध्ये पार्किंगची सुविधा असूनही वाहने रस्त्यावर उभी केली जातात, त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर ताण येत आहे. पार्किंगबाबत कोणतीही शिस्त दिसत नसल्याने परिस्थिती अधिकच बिघडत चालली आहे.
या संदर्भात त्यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी फोनवर चर्चा केल्याचे सांगितले. तसेच ओला आणि उबरसारख्या सेवा देणाऱ्या कंपन्यांकडूनही पार्किंगच्या नियमांचे पालन होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. जोपर्यंत दंडात्मक कारवाई कठोरपणे अंमलात आणली जात नाही, तोपर्यंत शहरांमध्ये शिस्त प्रस्थापित होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
शहरात किती लोक स्थायिक होऊ शकतात, याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी मांडले. आपली शहरे उद्ध्वस्त होत आहेत आणि विरोधी पक्ष म्हणून या मुद्द्यांवर बोलणे ही आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकांनंतरही संवाद सुरू ठेवणे आवश्यक असून, काम करून घेण्यासाठी नेत्यांनी एकमेकांना भेटणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.