उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ५ जणांचा विमान अपघातात मृत्यू

0

पुणे /बारामती : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे आज,बुधवारी सकाळी एका विमान अपघातात निधन झाले. पुणे जिल्ह्यातील बारामती येथे लँडिंगदरम्यान झालेल्या या दुर्घटनेत एकूण ५ जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विमानात अजित पवार यांच्यासोबत त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव, विमान परिचारिका पिंकी माळी, पायलट कॅप्टन सुमित कपूर तसेच कॅप्टन शांभवी पाठक हे प्रवास करत होते. अपघात इतका भीषण होता की सर्वांचा जागीच मृत्यू झाला.जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी बारामती येथे अजित पवार यांच्या ४ जाहीर सभा नियोजित होत्या.

या कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी ते नेहमीप्रमाणे सकाळी लवकर मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. विमान बारामती येथे उतरण्याच्या प्रक्रियेत असतानाच हा अपघात झाला.अपघातानंतर घटनास्थळावरून समोर आलेल्या छायाचित्रे आणि व्हिडिओंमध्ये विमान पूर्णपणे उद्ध्वस्त व जळून खाक झालेले दिसत होते. आसपासच्या गावांतील नागरिकही घटनास्थळी दाखल झाले होते. दृश्य अत्यंत हृदयद्रावक होते, ज्यामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली. माहितीनुसार, अजित पवार ज्या विमानातून प्रवास करत होते ते बॉम्बार्डियर कंपनीचे लिअरजेट-४५ श्रेणीतील होते. प्रत्यक्षदर्शींनुसार, विमान प्रथम खाली येताना दिसले आणि नंतर अचानक नियंत्रण सुटून जमिनीवर आदळले, त्यानंतर मोठा स्फोट झाला.

अजित पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला होता. ‘दादा’ या नावाने ओळखले जाणारे अजित पवार आपल्या स्पष्टवक्तेपणा आणि भक्कम प्रशासकीय क्षमतेसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी १९८२ साली सहकार क्षेत्रातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर ते बारामती विधानसभा मतदारसंघातून सलग अनेक वेळा आमदार म्हणून निवडून आले आणि राज्य सरकारमध्ये विविध महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री राहिले.वित्त, नियोजन, ऊर्जा, जलसंपदा आणि ग्रामीण विकास यांसारख्या महत्त्वाच्या विभागांचे त्यांनी नेतृत्व केले. महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक अनुभवी प्रशासक आणि लोकनेता गमावला आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती, पुणे आणि संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सुनेत्रा पवार तसेच पार्थ आणि जय हे दोन पुत्र आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech