बेस्ट क्रेडिट सोसायटी निवडणूक निकालाचा अन्वयार्थ

0

नितीन सावंत

बेस्ट कामगारांच्या सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत प्रथमच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने या निवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. बेस्टची ही क्रेडिट सोसायटी ताब्यात घेण्यासाठी तब्बल चार पॅनल रिंगणात उतरले होते. ठाकरे बंधूंचा पराभव करण्यासाठी महायुती सरकारचे भक्कम पाठिंबा असलेले सहकार समृद्ध पॅनलही या निवडणुकीत होते. प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, नितेश राणे आणि शिंदे सेनेचे किरण पावसकर यांनी एकत्र येऊन महायुतीचे हे पॅनेल रिंगणात उतरवले होते. माजी शिक्षक आमदार कपिल पाटील अध्यक्ष असलेल्या हिंद मजदूर किसान पंचायत यांच्या नेतृत्वाखालील शशांक राव यांच्या बेस्ट वर्कर्स युनियनचे पॅनलही रिंगणात होते. त्याचबरोबर कम्युनिस्ट ते भाजप व्हाया शिवसेना असा प्रवास असलेले सुनील गणाचार्य यांचे पॅनलही रिंगणात होते परंतु बेस्ट कामगारांनी या पॅनलची फारशी दखल घेतली नाही.

दिवंगत कामगार नेते शरद राव यांचे पुत्र असलेले शशांक राव यांचा बेस्ट मध्ये दबदबा आहे. परंतु ही निवडणूक महायुती पॅनल आणि सेना मनसे पॅनल अशी होणार असे चित्र माध्यमांनी रंगवले होते. शशांक राव हे तांत्रिकदृष्ट्या भाजपमध्ये असले तरी महायुतीच्या पॅनलने त्यांना सोबत घेतले नाही. किंबहुना त्यांनीच या पॅनेल सोबत जाण्यास नकार दिला. मात्र शशांक राव यांची बेस्ट कामगारांच्या मागण्यांसाठी गेली अनेक वर्ष सुरू असलेली लढाई या निवडणुकीत त्यांना यश देऊन गेली. शिवसेनेचा पराभव हा त्यांच्या बेस्ट मधील कर्तुत्वामुळे झाला. त्याला अनेक कारणे आहेत. या निवडणुकांचा महानगरपालिका निवडणुकांची अर्थाअर्थी संबंध नसला तरी बेस्ट समिती आणि महानगरपालिका ताब्यात असताना केलेल्या चुका शिवसेना आणि मनसेला या पराभवाकडे घेऊन गेल्या.

२०१९ साली बेस्ट कामगारांच्या मागण्यांसाठी शशांक राव यांच्या नेतृत्वाखाली बेस्ट वर्कर्स युनियनने संप पुकारला होता. या संपाला शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेनेने सुद्धा पाठिंबा दिला होता. परंतु आठ दिवसात बेस्ट कामगार सेनेने हा संप मागे घेऊन कामगारांची फसवणूक केली अशी बेस्ट कामगारांची धारणा होती. हा संप घेण्यास मागे घेण्यास बेस्ट कामगार सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांचा ही विरोध होता. शिवसेनेने हा संप मागे घेण्यास शशांक राव यांच्यावर दबाव आणला. परंतु कामगारांचे प्रश्न सुटल्याशिवाय मी हा संप मागे घेणार नाही अशी भूमिका त्यांनी त्यावेळी घेतली. त्यानंतर आशिष शेलार यांनी मध्यस्थी करून शशांक राव यांची भेट तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी घालून दिली. राज्य सरकारकडून ठोस आश्वासन मिळाल्यानंतर बेस्ट वर्कर्स युनियनने संप मागे घेतला. त्यामुळे बेस्ट कामगारांचा विश्वास शशांक राव यांच्यावर शंभर टक्के असल्याचे या निवडणूक निकालावरून दिसले. त्यानंतर शशांक राव यांना ईडीच्या नोटीसा आल्यामुळे ते लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये गेले. एका बाजूला शिवसेनेशी लढायचे आणि दुसऱ्या बाजूला सत्ताधारी भाजपचा रोष अंगावर घ्यायचा. यातून कामगारांचे नुकसान होईल हे लक्षात आल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता असताना आणि बेस्ट समिती शिवसेनेच्या ताब्यात असताना त्यांनी कामगारांच्या हिताकडे लक्ष दिले नाही असा आरोपही शशांक राव यांनी केला आहे. या आरोपांमध्ये तथ्य आहे. ३३३७ नव्या बसेस घेण्याचा प्रस्ताव असताना शिवसेनेने या बसेस खरेदी केल्या नाहीत. त्यामुळे कामगारांची कपात झाली. नवीन कंत्राटी बसेस आणून कंत्राटी बेस्ट कंडक्टरची आणि ड्रायव्हरची भरती करण्यास शिवसेनेने अनुमती दिली. त्यामुळे कंत्राटदराचे भले आणि कामगारांचे नुकसान झाले. निवडणुकीपूर्वी वचननाम्यात बेस्ट बाबत दिलेले एकही आश्वासन शिवसेनेने पूर्ण केले नाही. 2021 पासून निवृत्त कामगारांना ग्रॅज्युएटी मिळाली आहे. कामगार निवृत्त झाल्यानंतर तीन महिन्याच्या कालावधीत त्याला ग्रॅज्युइटी मिळणे बंधनकारक असताना अजूनही कामगारांना ग्रॅज्युएटी मिळालेली नाही. याला जबाबदार कोण? असा सवालही शशांक राव यांनी केला आहे. त्यामुळेच बेस्ट कामगाराने या निवडणुकीत शिवसेनेला त्यांची जागा दाखवली. या निवडणुकीत कोणताही ब्रँड चालला नाही. जो कामगारांच्या हिताचे निर्णय घेईल तोच भविष्यात टिकेल असेही त्यांनी लक्षात आणून दिलेले आहे.

भाजपनेही या निवडणुकीचे क्रेडिट घेण्यास सुरुवात केली आहे. भाजपला जर शशांक राव यांना मदत करण्याची इच्छा असती तर त्यांनी सहकार समृद्ध या आपल्या पॅनलला उभे करण्यास परवानगी दिली नसती. महायुतीचे नेते प्रसाद लाड यांनीही हे पॅनेल महायुतीचे नव्हते असा प्रचार निकालानंतर करण्यास सुरुवात केली आहे. बेस्टच्या पुरवठा विभागात प्रसाद लाड यांच्या श्रमिक उत्कर्ष सभा या युनियनचा दबदबा आहे. पूर्वी ए.डी.गोलंदाज आणि विठ्ठल गायकवाड यांच्या सप्लाय युनियनचा पुरवठा विभागात दबदबा होता. परंतु अदानी एनर्जी या युनियन कडे लक्ष दिल्याने बेस्टच्या युनियनकडे गायकवाड यांचे दुर्लक्ष झाले. त्यातूनच प्रसाद लाड यांनी श्रमिक उत्कर्ष सभे मार्फत आपल्या युनियनचा येथे पसारा वाढवला. त्यामुळेच महायुतीच्या पॅनलच्या सहा जागा निवडून आल्या. शिवसेना मनसे आणि महायुती अशी लढाई रंगवली असतानाच कामगारांना विश्वासात घेऊन शशांक राव यांनी या निवडणुकीत बाजी मारली आहे.

नितीन सावंत, ९८९२५१४१२४

 

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech