रांची : नक्षलविरोधी अभियानाअंतर्गत गुरुवारी चाईबासा जिल्ह्यातील सारंडा जंगल परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवादी संघटनेमध्ये भीषण चकमक झाली. छोटानागरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घनदाट आणि दुर्गम जंगलात ही चकमक झाली. या चकमकीत एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर असलेला नक्षलवादी अनल याच्यासह त्याचे ९ ते १० साथीदारांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार,सीआरपीएफ आणि झारखंड पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सारंडा जंगलात नक्षलवाद्यांच्या हालचालींबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर कोब्रा बटालियन, झारखंड जगुआर आणि जिल्हा पोलिसांची संयुक्त टीम या भागात शोधमोहीमेसाठी दाखल झाली.
शोधमोहीमेदरम्यान सुरक्षा दल नक्षलवाद्यांच्या जवळ पोहोचताच, आपण घेरले गेलो असल्याचे लक्षात येताच नक्षलवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला. त्याला सुरक्षा दलांनी तत्काळ प्रत्युत्तर देत मोर्चा सांभाळला. दोन्ही बाजूंनी बराच काळ जोरदार गोळीबार सुरू होता, त्यामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. सुरक्षा दलांचा दबाव वाढताच काही नक्षलवादी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे. चकमक संपल्यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला असून सध्या शोधमोहीम सुरू आहे. सुरक्षा यंत्रणा परिसरावर सतत लक्ष ठेवून आहेत. कोणत्याही नक्षलवादी हालचालींवर तात्काळ कारवाई करता यावी यासाठी अतिरिक्त दलही तैनात करण्यात आले आहे.