भारतीय रेल्वेने कन्फर्म तिकीट रद्द करण्याच्या नियमांमध्ये केले बदल

0

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने कन्फर्म तिकीट रद्द केल्यावर प्रवाशांना किती रक्कम परत द्यायची याबाबत नवे नियम जाहीर केले आहेत. या नव्या नियमानुसार, प्रवाशांनी तिकीट रद्द करण्याची वेळ लक्षात घेऊन रिफंडची रक्कम ठरणार आहे. ट्रेन सुटण्याच्या ७२ तासांपूर्वी तिकीट रद्द केल्यास प्रवाशाला सर्वाधिक परतावा मिळणार असून केवळ किमान तिकीट रद्द शुल्क वजा करण्यात येईल.

जर प्रवाशाने ट्रेन सुटण्यापूर्वी ७२ ते २४ तासांच्या कालावधीत तिकीट रद्द केले, तर तिकिटाच्या एकूण रकमेपैकी २५ टक्के किमान रक्कम वजा करून उर्वरित पैसे परत केले जातील. त्याचप्रमाणे, ट्रेन सुटण्यापूर्वी २४ ते ८ तासांच्या दरम्यान तिकीट रद्द केल्यास ५० टक्के किमान रक्कम कपात केली जाईल. मात्र, ट्रेन सुटण्याच्या ८ तासांच्या कालावधी नंतर तिकीट रद्द केल्यास कोणताही रिफंड दिला जाणार नाही, असा स्पष्ट नियम करण्यात आला आहे.

तिकीट रद्द करण्याच्या प्रक्रियेतही मोठा बदल करण्यात आला आहे. पूर्वी काउंटरवरून घेतलेले तिकीट प्रवास संपणाऱ्या स्टेशनवरच रद्द करावे लागत होते, मात्र आता कोणत्याही रेल्वे स्थानकावर तिकीट रद्द करता येणार आहे. ई-तिकीटधारकांसाठी देखील प्रक्रिया सुलभ करण्यात आली असून, यापूर्वी टीडीआर (TDR) फाईल करणे आवश्यक होते, ते आता गरजेचे राहणार नाही आणि रिफंड आपोआप खात्यात जमा केला जाईल.

याशिवाय, प्रवाशांना बोर्डिंग स्टेशन बदलण्याची सुविधा ट्रेन सुटण्यापूर्वी ३० मिनिटांपर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्यामुळे ट्रॅफिक किंवा इतर अडचणींमुळे उशीर झालेल्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. हे नवे नियम १ ते १५ एप्रिलदरम्यान लागू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारतीय रेल्वेने यापूर्वीही तिकीट बुकिंगसंदर्भातील नियमांमध्ये बदल करत बुकिंगची मर्यादा ६० दिवसांपर्यंत ठेवली असून, सुरुवातीचा काही कालावधी आधार प्रमाणीकरण केलेल्या प्रवाशांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech