एकनाथ शिंदे यांची निर्भीड विकासात्मक दूरदृष्टी…

ठाणे हे कोणाच्या दयेवर उभे राहिलेले शहर नाही. ठाणे हे शिवसेनेच्या संघर्षातून, रक्तातून, घामातून आणि निष्ठेतून उभे राहिलेले शहर आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे ठाण्यावर असलेले अपार प्रेम, स्वर्गीय आनंद दिघे साहेबांची वज्रनिश्चयी शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची निर्भीड विकासात्मक दूरदृष्टी — यामुळे ठाणे जिल्हा शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला बनला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी ठाणे म्हणजे केवळ भौगोलिक जवळीक नव्हती, तर राजकीय ताकदीचा मेरुदंड होता. ठाण्यातील शिवसैनिकांची आग, निष्ठा आणि लढाऊ वृत्ती बाळासाहेबांनी जवळून ओळखली होती. म्हणूनच त्यांनी ठामपणे सांगितले होते — “शिवसेनेची खरी ताकद ठाण्यात आहे.” बाळासाहेबांचा विश्वास हा निव्वळ शब्दांचा नव्हता, तो कृतीतून दिसणारा होता.
हा विश्वास जपला आणि वाढवला तो स्वर्गीय आनंद दिघे साहेबांनी. दिघे साहेब म्हणजे ठाण्यातील शिवसेनेचा वाघ होता. सत्तेला आव्हान देणारा, अन्यायाशी तडजोड न करणारा आणि सामान्य माणसासाठी रस्त्यावर उतरून लढणारा नेता म्हणजे दिघे साहेब. त्यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात शिवसेना म्हणजे केवळ संघटना नव्हे, तर हक्कासाठी लढणारी ताकद बनली. त्यामुळेच ठाणे जिल्हा शिवसेनेचा मजबूत किल्ला झाला — आणि तो बालेकिल्ला अजूनही अभेद्य आहे व राहिल.
वंदनीय बाळासाहेब व दिघे साहेबांच्या विचारांची परंपरा घेऊन पुढे चालणारे नेतृत्व म्हणजे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे.
कार्यकर्ता काय असतो, संघर्ष काय असतो आणि विकास कसा घडवायचा हे एकनाथ शिंदे यांना कोणी शिकवले नाही — त्यांनी ते अनुभवातून शिकलं. म्हणूनच त्यांचे राजकारण घोषणांवर नाही, तर ठोस कामावर उभे आहे. एकनाथ शिंदे म्हणजे शब्दांचा नेता नव्हेत, तर नागरी विकास कामाचा हिमालय पर्वत आहेत.
गेल्या २५ ते ५० वर्षांत ठाण्याचा चेहरा-मोहरा बदलला आहे. रस्ते, उड्डाणपूल, वाहतूक जाळे, पाणीपुरवठा, नागरी सुविधा, शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था — हा विकास कुणाच्या कृपेने झाला नाही. तो शिवसेनेच्या सातत्यपूर्ण नेतृत्वामुळे झाला आहे. ठाणे आज मुंबईला पर्याय म्हणून उभे आहे, हे कुणाला खटकत असेल — पण ते वास्तव आहे.
एकनाथ शिंदेंनी ठाण्याला केवळ घोषणा दिल्या नाहीत, तर आत्मविश्वास दिला. “ठाणे हे राहण्यायोग्य, स्वाभिमानी आणि विकासशील शहर” ही ओळख त्यांनी ठामपणे उभी केली. विकासाला विरोध करणाऱ्यांनी फक्त टीका केली; एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने मात्र विकास करून दाखवला.
ठाणेकरांचा शिवसेनेवरचा विश्वास हा कोणत्याही राजकीय समीकरणावर अवलंबून नाही. तो विश्वास रक्तात आहे. संकटात शिवसेना रस्त्यावर उतरली, विकासात शिवसेना पुढे राहिली आणि ठाणेकरांच्या हक्कासाठी शिवसेना नेहमी लढली — म्हणूनच ठाणे आजही शिवसेनेसोबत खंबीरपणे उभे आहे.
वंदनीय बाळासाहेबांचे स्वप्न, दिघे साहेबांचा संघर्ष आणि एकनाथ शिंदेंचे निर्णायक नेतृत्व — या त्रिशक्तीसमोर कुठलीही राजकीय चाल टिकू शकत नाही.
ठाणे शिवसेनेचे होते, आहे आणि राहील.
ही घोषणा नाही — हा इतिहास आहे.
ही भाषा नाही — ही ठाणेकरांची गर्जना आहे.

– दिनेश शिंदे, मिडिया समन्वयक,
शिवसेना पक्ष, ९७६९६-५२५६७