कान्समध्ये स्क्रीनिंग झाल्यावर ‘ऊत’ चित्रपटावर प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव

0

मुंबई : ‘ऊत’ या मराठी सिनेमाच्या पोस्टर आणि गाण्यांपासून सर्वांना हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान रिलीजआधीच ‘ऊत’च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय.सिनेविश्वातील मानाच्या समजल्या जाणार्‍या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘ऊत’ या मराठी सिनेमाचं स्क्रीनिंग काहीच दिवसांपूर्वी पार पडले. विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गाजलेल्या वेरा फिल्म्सच्या ‘ऊत’ या मराठी चित्रपटाचे स्क्रीनिंग कान्स महोत्सवात संपन्न झाले.

मलेशिया फिल्म फेस्टिव्हल, ईस्टर्न युरोप फिल्म फेस्टिव्हल, ईस्ट विलेज न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल, सिनसिने फिल्म फेस्टिव्हल,श्रीलंका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, मँचेस्टर फिल्म फेस्टिव्हल, अहमदाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल या सारख्या अनेक देशी-विदेशी चित्रपट महोत्सवात ‘ऊत’ या मराठी चित्रपटाने आपली यशस्वी मोहोर उमटविली आहे. त्यानंतर काहीच दिवसांपूर्वी पार पडलेल्या ‘कान्स’ सारख्या प्रतिष्ठित महोत्सवात ‘ऊत’ या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सर्वांनी सिनेमावर कौतुकाचा वर्षाव केला. राम मलिक दिग्दर्शित या चित्रपटातून राज मिसाळ आणि आर्या सावे हे युवा कलाकार भेटीला आले आहेत.

कान्स सारख्या प्रतिष्ठेच्या महोत्सवात चित्रपटाचे स्क्रीनिंग आणि त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळणे ही आमच्या चित्रपटाच्या टीमसाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे चित्रपटाचे मुख्य अभिनेते राज मिसाळ यांनी सांगितले. समाजापर्यंत चांगला दृष्टिकोन पोहोचवण्याचा केलेल्या प्रयत्नाचं हे यश आहे, अशी भावना त्यांनी या स्क्रीनिंग नंतर व्यक्त केली. ‘ऊत’ चित्रपटातून एक ज्वलंत सामाजिक विषय मांडण्यात आला असून लवकरच हा चित्रपट रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech