राज्यातील २९ महापालिकांमध्ये महापौरपद आरक्षणाची सोडत गुरुवारी

0

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष महापौर कोण ठरेल याकडे लागले आहे. या पार्श्वभूमीवर, महापौरपदासाठी आरक्षणाची अधिकृत सोडत गुरुवार, २२ जानेवारी २०२६ रोजी मंत्रालयात काढली जाणार आहे. नगर विकास विभागाच्या पत्रानुसार, ही सोडत राज्याच्या नगर विकास राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असून मंत्रालयातील ६ व्या मजल्यावरील परिषद सभागृहात सकाळी ११.०० वाजल्यापासून प्रक्रियेला सुरुवात होईल. या सोडतीत अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागास प्रवर्ग (OBC) आणि महिलांसाठी महापौरपद निश्चित केले जाणार आहे.

मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, संभाजीनगर यांसारख्या मोठ्या शहरांसह राज्यातील २९ महापालिकांमध्ये ही सोडत अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी येते यावर अनेक राजकीय दिग्गजांचे महापौर होण्याचे स्वप्न अवलंबून आहे. खुल्या प्रवर्गाचे आरक्षण आल्यानंतर राजकीय गती अधिकच वाढण्याची शक्यता आहे. नगर विकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या सोडतीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले असून, राज्यमंत्र्यांच्या खाजगी सचिवांना नियोजनाची माहिती देण्यात आली आहे. २२ जानेवारीच्या दुपारपर्यंत राज्यातील २९ शहरांच्या महापौरपदाचे चित्र स्पष्ट होणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech