रांची : झारखंडमधील गुमला जिल्ह्यातील पोलिसांनी झारखंड जनमुक्ती परिषदच्या (जेजेएमपी) तीन नक्षलवाद्यांना चकमकीत ठार केले आहे. बुधवारी सकाळी बिशनपूर जिल्ह्यातील पोलीस स्टेशन परिसरातील केचकी जंगलात ही चकमक झाली. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये लोहारदगातील सेन्हा येथील रहिवासी लालू लोहारा, सुजित ओरांव आणि लातेहारमधील होशीर येथील रहिवासी छोटू ओरांव यांचा समावेश आहे. सब-झोनल कमांडर लालू लोहारा आणि दुसरा सब-कमांडर छोटू ओरांव यांच्यावर प्रत्येकी ५ लाख रुपयांचे बक्षीस होते. एसपी हरिस बिन जमान यांनी तीन नक्षलवाद्यांना ठार मारल्याची माहिती दिली आणि सांगितले की, घटनास्थळावरून तीन शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये एके-५६ रायफल, एक एसएलआर आणि एक इन्सास रायफलचा समावेश आहे. सध्या सुरक्षा दल परिसरात शोध मोहीम राबवत आहेत.
यापूर्वी, गुमला पोलीस अधीक्षक हरीश बिन जामा यांना माहिती मिळाली होती की, जेजेएमपी संघटनेचे काही नक्षलवादी बिशनपूर परिसरात मोठी घटना घडवण्यासाठी जमले आहेत. या मिळालेल्या माहितीनंतर झारखंड जग्वार्स आणि गुमला जिल्हा पोलिसांची संयुक्त टीम तयार करण्यात आली. टीमने परिसरात शोध मोहीम राबवली. पोलिसांचे पथक केचकी जंगलात पोहोचताच, नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरात तीन नक्षलवाद्यांना ठार मारले आणि एकाला अटक केली आहे.