मुंबई : केंद्रीय मंत्री अमित शाह आज पुण्याच्या दौऱ्यावर असताना तेथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण संपतानाच शिंदे यांनी धन्यवाद, जय महाराष्ट्र, जय गुजरात असा नारा दिला. त्यावर विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली. उबाठा गटाचे प्रवक्ता संजय राऊत यांनी ‘जय गुजरात’वरून एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधला आहे. अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप आज बाहेर आलं. तसेच हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो?, असा सवालही विचारला आहे. संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. “अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप आज बाहेर आलं. पुण्यात या महाशयांनी अमित शाह यांच्यासमोर “जय गुजरात“ची गर्जना केली! काय करायचं? ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा, हजार माराव्या आणि एक मोजाव्या. हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो?” असंही राऊत यांनी म्हटलं आहे.