पाच वर्षांनंतर ‘बसरा स्टार’ जहाज भंगारात काढणार

0

रत्नागिरी : मिऱ्या किनाऱ्यावर निसर्ग चक्रीवादळामुळे अडकून पडलेले बसरा स्टार जहाज बाहेर काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तब्बल पाच वर्षांनंतर हे जहाज बाहेर काढण्यात येणार असून, सुमारे ३५ कोटींचे हे जहाज दोन कोटी रुपयांना भंगारात काढले जाणार आहे. याबाबत एम. एम. शिपिंग कॉर्पोरेशन कंपनीचे आतिफ सोलकर सीमाशुल्क आणि मेरिटाइम बोर्डाशी पत्रव्यहार करत आहेत. ५०० टन वजनाचे हे जहाज परवानगी मिळाल्यावर १५ दिवसांत भंगारात काढले जाणार आहे. बसरा स्टार जहाजामुळे मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम रखडले आहे. त्यामुळे पत्तन विभागाने याबाबत मेरिटाइम बोर्ड आणि कस्टम विभागाला जहाज बाहेर काढण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. त्याला मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या आढावा बैठकीत अधिक चालना मिळाली. त्यामुळे हे जहाज काढण्याच्या कामाला गती मिळाली आहे.

दुबईहून हे जहाज मालदीवला जात असताना ३ जून २०२० रोजी निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडल्याने मिऱ्या किनारी अडकून पडले. हे जहाज बाहेर काढण्याबाबत दुबई येथील जहाज मालकाशी संपर्क झाला असून, त्यांनी ४० लाखांची कस्टम ड्युटी भरल्यानंतर ते भंगारात काढण्याबाबतची प्रक्रिया सुरू होणार आहे. कन्सल्टंट कंपनीने तसा पत्रव्यवहार सुरू केला आहे. केंद्र शासनाची जहाज भंगारात काढण्याबाबत परवानगी मिळाल्यानंतर कस्टम विभाग या जहाजाचे मूल्यांकन करेल.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech