पलक्कड : केरळच्या पल्लकडमध्ये आयोजित मुस्लिम धर्मियांच्या उर्समध्ये हमासच्या दहशतवाद्यांचे पोस्टर्स झळकवण्यात आल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. यासंदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली आहे. यासंदर्भातील माहितीनुसार १६ फेब्रुवारी रोजी पलक्कड येथील मुस्लिम संत त्रिथला यांच्या समाधीस्थळावर उरुसाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात हजारो लोक होते. त्यानंतर, हत्तींवर हमासचे दहशतवादी इस्माईल हनिया, याह्या सिनवार आणि हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्लाह यांचे पोस्टर्स दिसले. या घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर केरळचे भाजपाध्यक्ष के. सुरेंद्रन म्हणाले की, राज्यातील सीपीआयएम सरकारच्या पाठिंब्याने हे सर्व उपक्रम मतांच्या राजकारणासाठी केले जात आहेत. के. सुरेद्रन यांनी यासंदर्भातील व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. या उत्सवात हमासचा इस्माईल हानिया आणि याह्या सिनवार यांचे फोटो हत्तींवर बसून काढण्यात आले, जिथे एक कम्युनिस्ट मंत्री आणि एक माजी काँग्रेस आमदार देखील उपस्थित होते. स्थानिक लोकांच्या मते, हा कार्यक्रम त्रिथला पंचायतीने आयोजित केला होता.
 
								
				 
					
										
												
				 
	
											 
	
											