भाजपा नेते प्रविण दरेकरांची चौकशीची मागणी
मुंबई : आज विधानपरिषदेत भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले कि, मुंबईत जोरजबरदस्तीने जागा हडपण्याचा प्रयत्न काही लँडमाफिया करत आहेत. जोगेश्वरीच्या शुक्ला नावाच्या गुन्हेगारी प्रवृतीच्या भुमाफियाने बांद्रेकरवाडीतील दुसऱ्याची जागा रात्रीचे तीन पत्रे ठोकून हडप केली. याबाबत मुंबई पोलीस आयुक्तांशी बोललो. अखेर रात्री राज्याच्या मुख्यमंत्री यांना फोन लावून चर्चा केली. मुख्यमंत्री यांनी तात्काळ पोलीस उपायुक्त गुंजाळ यांना अशा प्रकारची कुणी दादागिरी करत असेल तर तात्काळ थांबवावी, असे आदेश दिले. परंतु जोगेश्वरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवराज सिंग बोरसे व पोलीस अधिकारी शिंदे यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली दिसून येत नाही. हे अत्यंत गंभीर असून या प्रकरणाची शासनाने चौकशी करावी. मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस अधिकारी काहीच कारवाई करताना दिसत नाही. याप्रकरणी शासनाने लक्ष घालून कारवाई करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी केली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही कारवाई होत नसेल तर ते चुकीचे आहे. याप्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासक उत्तर मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.