मुंबई : काँग्रेस पक्षाला नवी ऊर्जा आणि बळ देण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संघटनात्मक फेरबदलाची प्रक्रिया सुरु केली आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून आज काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची जिल्हानिहाय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या अहवालानंतर संघटनेत बदल करण्यात येणार आहेत. फेरबदलाच्या या प्रक्रियेत मंडल स्तरापासून प्रदेश पातळीपर्यंत काँग्रेस संघटना मजबूत करण्यासाठी आवश्यक ते बदल केले जाणार आहेत. रिक्त पदावर नियुक्त्या करण्यात येणार आहेत. तसेच जिथे आवश्यक आहे तिथे नवीन चेह-यांना जबाबदारी दिली जाणार आहे. या संदर्भात नियुक्त करण्यात आलेल्या निरीक्षकांची बैठक आज प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, कुणाल चौधरी, प्रफुल्ल गुडदे पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ॲड. गणेश पाटील, मोहन जोशी उपस्थित होते. या बैठकीत प्रांताध्यक्षांनी निरीक्षकांना यासंदर्भात सूचना केल्या. हे सर्व निरीक्षक त्यांना नेमून दिलेल्या जिल्ह्यात जाऊन काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून १५ दिवसांत प्रदेश काँग्रेसला आपला अहवाल सादर करणार आहेत. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संघटनात्मक फेरबदलांच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
 
								
				 
					
										
												
				 
	
											 
	
											