पुणे : “केंद्र सरकारचे नवीन शैक्षणिक धोरण राज्यात रेटून नेण्याचा प्रयत्न सुरु आहे. शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न व हिंदी भाषा सक्तीची करण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. एसएससी बोर्डाचा अभ्यासक्रम सर्वोत्तम आहे, सीबीएसईचा पर्याय द्या, मात्र सक्ती करू नका. मराठी भाषा प्रत्येकाला आली पाहिजे, हिंदी किंवा अन्य भाषा पर्याय म्हणून ठेवा.’ अशा शब्दात खासदार व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला सुनावले.
खासदार सुळे पुणे दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सुळे म्हणाल्या, “सीबीएसई पॅटर्नसाठी शिक्षक देखील अजून तयार झालेले नाही. बालभारतीची पुस्तके व एसएससी बोर्डाचा अभ्यासक्रमाची देशाने दखल घेतलेली आहे. नवीन शैक्षणिक धोरणाद्वारे मराठी भाषेवर अन्याय करण्याचा प्रकार सुरू असून आम्ही तो खपवून घेणार नाही.