नितीन सावंत
लोकसभा निवडणुकीत एकदा पराभव पत्करलेले मनसेचे उमेदवार आणि सुप्रसिद्ध मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी नुकतीच मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत एका प्रश्नाला अर्थात एका प्लांट प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत जाण्याची हाळी दिली. विशेष म्हणजे उगाचच मराठी जनतेच्या मनातील व्हिलन बनू नये यासाठी उद्धव ठाकरे यांनीही लगेच या हाळीला टाळी दिली.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर राज ठाकरे यांना जाग आली आहे. त्यामुळेच त्यांनी मराठीचा मुद्दा पकडून उद्धव ठाकरे यांना एकीची हाक दिली. यापूर्वीही हे दोन भाऊ एकत्र येण्यासाठी अनेक प्रयत्न झाले पण उद्धव ठाकरे यांच्या अहंकारापायी एकत्र येण्याचे प्रयोग अयशस्वी ठरले. खरे म्हणजे राज ठाकरे यांनी मैदान आणि उद्धव ठाकरे यांनी संघटना प्रशासन सांभाळले असते तर शिवसेना कुठल्या कुठे निघून गेली असती. केवळ दोघांच्या वैयक्तिक अहंकारामुळे मराठी माणसाचे नुकसान तर झालेच परंतु दोन्ही संघटनेतल्या सैनिकांचे त्यापेक्षा मोठे नुकसान झाले. शिवसेनेच्या महाबळेश्वर शिबिरापासून राज ठाकरे यांना शिवसेनेबाहेर कसे काढता येईल याचे प्रयत्न सुरू झाले. अखेर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीतच राज ठाकरे यांना शिवसेना पक्ष सोडण्यास भाग पाडण्यात आले.
विशेष म्हणजे या पक्ष स्थापनेनंतर राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करण्याऐवजी शिवसेनेला कसे लक्ष्य येईल याकडे जास्त लक्ष दिले. उलट तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याशी हात मिळवणी करून शिवसेनेचे उमेदवार कसे पाडता येतील याला प्राधान्य दिले. हा वैयक्तिक मुकाबला करताना राज ठाकरे यांच्या मनसेचे नुकसान झाले. मात्र त्यावेळी एका लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप या दोघांचेही राज्यात नुकसान झाले.त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे तेरा आमदार निवडून आले. त्यावेळी राज ठाकरे फारच हवेत गेले होते. मात्र त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत अनेक आमदारांचे डिपॉझिट जप्त झाले. त्यामुळे मनसेला गळती लागली. काही लोक शिवसेनेत परतले आणि काही मंडळी भाजपमध्ये गेली. मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील द्वेष एवढा होता की एकेकाळी हे दोघे भाऊ एकत्र होते यावर कुणी विश्वास ठेवणार नाही. त्यावेळी मनसेतून येणाऱ्याला शिवसेनेत रेड कार्पेट होते. त्याचबरोबर महत्त्वाचे पदेही मनसेतून आलेल्या मंडळींना मिळत असत. उद्धव ठाकरे यांचा मुख्य शत्रु त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी नव्हता तर मनसे हा पक्ष होता.
वैयक्तिक बाबतीत तर उद्धव ठाकरे फारच टोकाला जात असत. महाराष्ट्र टाइम्सचे तत्कालीन संपादक भरत कुमार राऊत यांना शिवसेनेने राज्यसभा दिली. त्यावेळी त्यांचा मुलगा ओम राऊत त्याचा विवाह होता. प्रथेपमाणे या विवाहाचे निमंत्रण उद्धव यांच्यासोबत राज ठाकरे यांनाही गेले होते. राज ठाकरे या विवाह समारंभात उपस्थित राहिले. राज ठाकरे या विवाहाला येऊन गेल्याचे समजताच उद्धव ठाकरे यांनी या विवाहाला जाण्याचे टाळले. शिवसेनेच्या राज्यसभा खासदाराच्या मुलाच्या लग्नात शिवसेना पक्षप्रमुख उपस्थित नव्हते तर मनसे प्रमुख उपस्थित होते. राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांना कसा बाहेरचा रस्ता दाखवला याची उदाहरणे शिवाजी पार्कच्या एका सभेत सांगितली आहेतच. परंतु शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा नसताना राज ठाकरे यांना शिवसेनेच्या बाहेर का पडावे लागले ही गोष्ट अजून गुलदस्त्यातच आहे.
मात्र यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाची जनमानसातील प्रतिमा पाहून एक पाउल मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा त्यांच्या हातावर टाळी दिली असली तरी ते राज ठाकरे यांना सोबत घेण्याची शक्यता धूसर आहे. राज ठाकरे हे मैदान गाजवणारे नेते आहेत त्यामुळे उद्या एकत्र आल्यास अर्थात त्यांचाच प्रभाव जनमानासमोर पडणार ही काळया दगडावरची रेघ आहे. मात्र झाले गेले विसरण्याची तयारी राज ठाकरे यांनी दाखवली असली तरी उद्धव ठाकरे हे कितपत मनाचा मोठेपणा दाखवतात यावर पुढील निर्णय अवलंबून आहे. सध्याच्या परिस्थितीत दोघांचा मुख्य शत्रू हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या आशीर्वादाने मूळ शिवसेना पळवली याची खंत उद्धव ठाकरे यांना आहे तर आयुष्यात पहिली निवडणूक लढवणारा आपला मुलगा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमुळे पडला याची सल राज ठाकरे यांना आहे.
नितीन सावंत, ९८९२५१४१२४