काश्मीरमधील परिस्थितीसंदर्भात मोदी सरकारचा विमान कंपन्यांना इशारा

0

नवी दिल्ली : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री श्री राम मोहन नायडू यांनी पीडित पर्यटक आणि त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी काही वेगवान निर्णय घेतला असून विमान कंपन्यांना सज्जड दम भरला आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांनी वैयक्तिकरित्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांशी चर्चा केली आहे. या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांशी जवळून समन्वय साधून काम करण्याचे निर्देश देखील दिले आहेत. नायडू हे काश्मीरमधील परिस्थितीवर २४ तास लक्ष ठेवून आहेत. पीडितांना तात्काळ मदत पोहचवण्याच्या उद्देशाने श्रीनगरहून ४ विशेष विमानांची व्यवस्था करण्यात आली आहे. यापैकी २ विमानं दिल्ली आणि २ विमानं मुंबईला पाठवली जाणार आहेत. तसेच पुढील पीडितांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त विमाने केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्रालयाकडून तयार ठेवण्यात आली आहेत.

कॅबिनेट मंत्री श्री राम मोहन नायडू यांनी सर्व विमान कंपन्यांसोबत तातडीची बैठक घेतली आणि विमान कंपन्यांना वाढीव किमतींसंदर्भात दम भरल्याप्रमाणे कठोर शब्दांमध्ये थेट इशाराच दिला आहे. “या संवेदनशील काळात कोणत्याही प्रवाशावर भार पडू नये याची खात्री करून विमान कंपन्यांना नियमित भाडे पातळी राखावी,” असे निर्देश केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांकडून देण्यात आले आहेत. नागरी विमान वाहतूक मंत्रालय काश्मीरमधील परिस्थितीसंदर्भात अलर्टवर असून सर्व बाधितांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी आम्ही वचनबद्ध असल्याचं मंत्रालयाने म्हटलं आहे.याशिवाय , नायडू यांनी सर्व विमान कंपन्यांना मृत व्यक्तीचे पार्थिव त्यांच्या मूळ राज्यात पोहोचवण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्य सरकारे आणि स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधून काम करावे, असं नायडू यांच्याकडून कंपन्यांना सांगण्यात आलं आहे.दरम्यान, या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचं पार्थिव आज(दि. २३) विशेष विमानाने पुणे विमानतळावर आणलं जाणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech