रायपूर : छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील कॅरेगुट्टा जंगल भागात मोठी नक्षलविरोधी कारवाई सुरु आहे. या कारवाईत आतापर्यंत ५ नक्षलवादी ठार झाले आहेत. देशातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या नक्षलविरोधी कारवाई मानली जात आहे. कारण यात छत्तीसगड, तेलंगणा आणि महाराष्ट्रातील २० हजार सुरक्षा कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. सुरक्षा दलांनी बिजापूर जिल्ह्यातील कॅरेगुट्टा जंगल भागात १ हजार नक्षलवाद्यांना घेरल्याची माहिती पुढे आली आहे.
ही कारवाई सुमारे ४८ तासांपासून सुरू आहे. मोस्ट वॉन्टेड कमांडर हिडमा आणि बटालियन प्रमुख देवा यांच्यासह प्रमुख नक्षलवादी नेत्यांच्या हालचालीबद्दल गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली. यात जिल्हा राखीव रक्षक दल (डीआरजी), बस्तर फायटर्स, विशेष टास्क फोर्स (एसटीएफ), राज्य पोलिसांच्या सर्व तुकड्या, केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) आणि त्यांच्या कमांडो बटालियन फॉर रिझोल्यूट ॲक्शन (कोब्रा) यांच्यासह विविध तुकड्यांतील सुरक्षा कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले आहेत.
नक्षलवाद्यांच्या पलायनाचे सर्व मार्ग बंद करण्यासाठी सुरक्षा दलांनी संवेदनशील छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरील कर्रेगुट्टा भागाला घेरले आहे. घनदाट जंगल आणि टेकड्यांनी वेढलेला हा परिसर माओवाद्यांच्या बटालियन क्रमांक १ चा अड्डा मानला जातो. काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी एक प्रसिद्धी पत्रक जारी केले होते. त्यातून त्यांनी ग्रामस्थांना डोंगरात प्रवेश न करण्याचा इशारा दिला होता. या भागात मोठ्या प्रमाणात आयईडी पेरण्यात आले असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते.
यावर्षी छत्तीसगडमधील विविध चकमकींत आतापर्यंत जवळपास १५० नक्षलवाद्यांना मारण्यात आले आहे. त्यात बस्तरमधील १२४ नक्षल्यांचा समावेश आहे. केंद्रानेदेखील झारखंडमध्ये नक्षलवाद्यांवर कारवाई केली. गेल्या आठवड्यात झारखंडमधील बोकारो जिल्ह्यात सीआरपीएफचे कोब्रा कमांडो आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत ८ नक्षलवादी ठार झाले. त्यात एक कोटी रुपयांचे बक्षीस असलेल्या एका वरिष्ठ नक्षली नेत्याचा समावेश होता.