अमरावती : अमरावती विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज यांच्या मूळ गाव माधान (ता. चांदूर बाजार) येथील संस्थानने विमानतळाला त्यांचे नाव देण्याची मागणी केली आहे.श्री संत गुलाबराव महाराज संस्थानने तातडीची सभा घेऊन याबाबत ठराव मंजूर केला. संस्थानचे विश्वस्त रमेश मोहोड यांनी मांडलेल्या प्रस्तावाला साहेबराव मोहोड यांनी अनुमोदन दिले. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विमानतळ विकास प्राधिकरणच्या उपाध्यक्ष स्वाती पांडेय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार बळवंतराव वानखडे आणि आमदार प्रवीण तायडे यांना पाठवण्यात आल्या आहेत.
संत गुलाबराव महाराज यांना १९०१ मध्ये माऊलींनी स्व-नामाचा मंत्र दिला. त्यांनी योगशास्त्र, संगीतशास्त्र, काव्यशास्त्र, आयुर्वेद आणि नीतिशास्त्राचा अभ्यास केला. पाश्चात्य तत्वज्ञानावरही त्यांनी खंडन-मंडन केले. त्यांनी स्वतःचा माऊली संप्रदाय स्थापन केला आणि नवीन नावंगलीपी तयार केली. महत्त्वाची बाब म्हणजे संत गुलाबराव महाराज केवळ ३४ वर्षे जगले. या अल्प आयुष्यात त्यांनी १३४ ग्रंथांची निर्मिती केली. त्यांचा जन्म बेलोरा विमानतळापासून ५ किलोमीटर अंतरावरील लोणी टाकळी येथे झाला. नवव्या महिन्यात त्यांची दृष्टी गेली. त्यानंतर ते माधान येथे वास्तव्यास होते. दरम्यान, विमानतळाला भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्याची मागणीही समोर आली आहे. त्यांच्या नावे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची शिक्षण संस्था आणि अकोला येथे कृषी विद्यापीठ आहे. विश्वस्त मंडळाने त्यांना भारतरत्न देण्याची मागणीही केली आहे.