कोकण रेल्वेच्या विनातिकीट प्रवाशांकडून २३ कोटीचा दंड वसूल

0

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध कोकण रेल्वे प्रशासनाने मोठी मोहीम चालवली आहे. या मोहिमेअंतर्गत गेल्या या आर्थिक वर्षात ९ हजार ७३१ प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून २३ कोटी १० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षाच्या तुलनेत ही दंडाची रक्कम १.७ कोटी रुपयांनी अधिक आहे.

महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकाला जोडणारा कोकण रेल्वे मार्ग हा एक महत्त्वाचा प्रवासी मार्ग आहे. या मार्गावरून दरवर्षी लाखो प्रवासी प्रवास करतात. मात्र, काही प्रवाशांकडून तिकीट न काढता फुकट प्रवास करण्याचे प्रकार वाढताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने कठोर भूमिका घेत विनातिकीट प्रवाशांविरुद्ध दंडात्मक कारवाई तीव्र केली आहे. रेल्वे प्रशासनाकडून वेळोवेळी कारवाई करूनही विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आता तिकीट न काढता प्रवास करणाऱ्यांना कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

कोकण रेल्वे प्रशासन प्रवाशांना चांगली सेवा आणि सुरक्षित प्रवास देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. प्रवाशांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. असे असतानाही काही प्रवाशांकडून फुकट प्रवास करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर नियमितपणे तिकीट तपासणी मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येत आहे, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech