मुंबई : ‘जिगीषा-अष्टविनायक’ निर्मित, महेश एलकुंचवार लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘वाडा चिरेबंदी’ या अभिजात नाटकाचे प्रयोग गेली दहा वर्ष मराठी रंगभूमीवर सातत्याने सादर झाले. समीक्षक, प्रेक्षक आणि मान्यवरांनी एकमुखानं हे नाटक गौरवलेलं आहे. हे नाटक पाहण्यासाठी सर्व क्षेत्रातले प्रेक्षक खास महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून येत होते. म.टा. सन्मान, मराठी अचिव्हमेंट अँड अॅवॉर्डस् इंटरनॅशनल सिडनी, महाराष्ट्र राज्य व्यावसायिक नाट्य स्पर्धा अशा प्रतिष्ठित पुरस्कारांचे मानकरी ठरलेलं नाटक आता अमेरिकेतील प्रेक्षकांसाठी सादर होत आहे. डिसेंबर २०२४ पासून भारतामधील ‘वाडा चिरेबंदी’चे प्रयोग थांबवले आहेत. या टीममधले शेवटचे प्रयोग बघण्याची संधी यानिमित्तानं अमेरिकेतील प्रेक्षकांना मिळणार आहे. या अभिजात कलाकृतीच्या समारोपाचे प्रयोग मे महिन्यात अमेरिकेत होणार आहेत. अमेरिकेत स्थायिक असलेले शैलेश शेट्ये आणि प्रमोद पाटील यांच्या ‘फाईव्ह डायमेन्शन्स’ या संस्थेने हा दौरा आयोजित केला आहे.