जम्मू काश्मीर : ट्रेकिंग आणि पर्यटन मोहिमांवर तात्पुरती घातली बंदी

0

श्रीनगर : पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीर प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव पुढील सूचना मिळेपर्यंत सर्व ट्रेकिंग मोहिमा तात्काळ थांबवल्या आहेत. या निर्णयामुळे हजारो पर्यटक आणि स्थानिक व्यावसायिकांवर परिणाम झाला असून, खोऱ्यातील पर्यटन उद्योगाला मोठा धक्का बसला आहे. सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे.

पहलगाम येथे मंगळवारी, २२ एप्रिल रोजी झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, जम्मू आणि काश्मीर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व प्रकारच्या ट्रेकिंग आणि पर्यटन मोहिमांवर तात्पुरती बंदी घातली आहे. हा निर्णय पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी घेण्यात आला असून, पुढील आदेश येईपर्यंत तो लागू राहील.विशेषतः पहलगामच्या उंचावरील भाग, ज्यात चंदनवाडी, अरु व्हॅली, बेताब व्हॅली आणि हल्ल्याचे केंद्रस्थान असलेली बैसरन व्हॅली यांचा समावेश आहे, तेथे पर्यटक आणि गिर्यारोहकांना प्रवेश पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, या भागांमध्ये कोणत्याही पर्यटन किंवा ट्रेकिंग उपक्रमांना परवानगी नाही.

परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत ही बंदी कायम राहील, असे प्रशासनाने म्हटले आहे. जम्मू-काश्मीर पोलीस, सीआरपीएफ आणि लष्कराने संयुक्तपणे सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली असून, उंचावरील भागात गस्त वाढवली आहे व ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे. पर्यटकांना केवळ अधिकृत आणि सुरक्षित ठिकाणीच जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सर्व ट्रेकिंग परवाने निलंबित केले असून, आधी दिलेले परवानेही रद्द केले आहेत.

दरवर्षी, विशेषतः उन्हाळ्यात बर्फ वितळल्यानंतर, हजारो पर्यटक काश्मीरमध्ये ट्रेकिंगसाठी येतात. या अचानक आलेल्या बंदीमुळे केवळ ट्रेकिंग शौकिनांचाच हिरमोड झाला नाही, तर स्थानिक अर्थव्यवस्थेवरही गंभीर परिणाम होणार आहे. मार्गदर्शक (गाईड), पोर्टर, होमस्टे चालक आणि दुकानदार, ज्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर ट्रेकिंग हंगामावर अवलंबून असते, त्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागेल.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech