एलईडी’द्वारे मासेमारीवर सर्व राज्यांनी बंदी घालावी…….?

0

केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन

मुंबई : अनंत नलावडे
केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन यांनी सोमवारी सर्व सागरी किनारपट्टीच्या राज्यांना ‘एलईडी’ दिव्यांचा वापर करून मासेमारी करण्यावर बंदी घालण्याचे निर्देश दिले.कारण ‘एलईडी’द्वारे मासेमारी म्हणजे एलईडी किंवा अन्य कलाकुसरीच्या दिव्यांच्या प्रकाशाने माशांना आकर्षित करून त्यांना पकडण्याची पद्धत आहे. महाराष्ट्रात यावर आधीच बंदी आहे, आणि आता इतर राज्यांनीही याची अंमलबजावणी करावी,असेही आवाहन रंजन यांनी केले.

मुंबईतील ताज हॉटेल येथे २८ एप्रिल रोजी देशातील मत्स्यव्यवसायाच्या वृद्धीसाठी आयोजित बैठकीनंतर पत्रकार परिषदेत राजीव रंजन यांनी उपस्थिती लावली.या बैठकीला महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय मंत्री नीतेश राणे यांच्यासह ९ राज्ये आणि ४ केंद्रशासित प्रदेशांचे सचिव उपस्थित होते.या राज्यांकडे विस्तीर्ण सागरी किनारपट्टी आहे,जी मत्स्यव्यवसाया साठी महत्त्वाची आहे.

यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत रंजन यांनी भारताच्या मत्स्यव्यवसाया तील प्रगतीचा विस्तृत आढावाही घेतला.ते म्हणाले,“जगात मत्स्य व्यवसायात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.गेल्या काही वर्षांत देशाच्या मत्स्य उत्पादनात दुप्पट वाढ झाली आहे. २०१४ मध्ये देशाचे मत्स्य उत्पादन ९४ लाख टन होते, तर आता ते १८४ लाख टनांवर पोहोचले आहे.तसेच, २०१४ मध्ये ३० हजार कोटी रुपयांची मत्स्य उत्पादने निर्यात होत होती,जी आता ६० हजार ५२३ कोटी रुपयांवर गेली आहे. यात आणखी वाढीची शक्यता आहे.”

रंजन यांनी मत्स्य व्यवसायाच्या विस्तारासाठी काही महत्त्वाच्या सूचना मांडल्या.ते म्हणाले,“भारतात ९ राज्ये आणि ४ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ११४ हजार किलोमीटरचे मत्स्य उत्पादन क्षेत्र आहे.माशांच्या प्रजनन काळात मासेमारी टाळण्यासाठी काळजी घ्यावी लागेल.निर्यात वाढवण्यासाठी मूल्यवर्धन आणि दर्जेदार वेस्टन यांवर लक्ष केंद्रित करावे लागेल.तसेच, छोट्या मासेमारांनाही प्रोत्साहन देण्याची गरज असल्याची आवश्यकता ही त्यांनी बोलून दाखविली.

महाराष्ट्रात ‘एलईडी’ मासेमारीवर बंदी असल्याने राज्याने याबाबत आघाडी घेतली आहे.बैठकीत महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय मंत्री नीतेश राणे यांनी राज्यातील मत्स्य व्यवसायाच्या प्रगतीबाबत माहिती देत केंद्राच्या निर्देशांना पाठिंबाही दर्शवला. केंद्रीय मत्स्य व्यवसायमंत्री राजीव रंजन यांनी ‘एलईडी’ मासेमारीवरील बंदीच्या आवाहना सह मत्स्य व्यवसायाच्या शाश्वत विकासावरही भर दिला.यामुळे पर्यावरण संतुलन राखण्यासोबतच मत्स्य व्यवसायाच्या दीर्घकालीन वाढीला चालना मिळेल,अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech