सर्वाधिक उंचीवरील पुलाचे काम कुठलीही तडजोड न करता काळजीपूर्वक करा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुंबई : मुंबई –पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकचे काम शेवटच्या टप्प्यात असून या प्रकल्पातील सर्वाधिक उंचीवरील पुलाचे काम कुठलीही तडजोड न करता काळजीपूर्वक करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी शिक्षण मंत्री दादाजी भुसे, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नविन सोना, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड, रस्ते सचिव श्री. दशपुते आदी यावेळी उपस्थित होते.
सुमारे १३. ३० कि.मी. लांबीच्या मिसिंग लिंकच्या पॅकेज एक आणि दोनचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. या शेवटचा टप्पा म्हणून सर्वाधिक उंचीचे पुलाचे काम सध्या सुरू आहे. हवेचा दाब आणि पुलाचे काम याची सातत्याने चाचणी करीत काम सुरू आहे. मिसिंग लिंकमुळे मुंबई-पुणे प्रवासात अजून २० ते २५ मिनीटांची बचत होणार असून त्याचे काम करताना कुठलीही तडजोड करू नका. उंचीवरील काम करताना अधिक काळजीपूर्वक करा. कामाची प्रत्येक पातळीवर चाचणी करीत जा, असे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.