मुंबईत ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट’चे भव्य आयोजन; पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटनासाठी उपस्थित राहणार – उद्योग मंत्री उदय सामंत

0

मुंबई : मुंबई बीकेसी येथील जियो वर्ल्ड सेंटर येथे १ मे पासून ४ मे २०२५ पर्यंत ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट’चा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमाचे १ मे रोजी उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज बीकेसी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या कार्यक्रमाचे यजमानपद महाराष्ट्र शासनाकडे असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे आयोजन होत आहे. पंतप्रधान मोदी १ मे रोजी संपूर्ण दिवसभर मुंबईत उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या सोबत परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचाही सहभाग राहणार आहे.

उद्योग मंत्री सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले की, मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. विशेषतः हिंदी चित्रपटसृष्टीचे माहेरघर हे मुंबईला म्हटले जाते. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी याच महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपट सुरू केले. त्यामुळे मनोरंजनाच्या क्षेत्रात मुंबई ही देशात अग्रगण्य शहर आहे. त्याचबरोबर, गेल्या तीन वर्षात महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक ही एक नंबरला आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्रात देखील महाराष्ट्र आणि मुंबई एक नंबरला राहिलेले आहे. पर्यटनाच्या दृष्टीने देखील महाराष्ट्र या देशाच्या पातळीवर अन्य देशांशी स्पर्धा करतो आहे. म्हणून पर्यटनाची सगळी स्थळे जागतिक पातळीवर जावी, हा देखील या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट’चा उद्देश आहे. तसेच महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची सांस्कृतिक संस्कृती, औद्योगिक संस्कृती, पर्यटन संस्कृती आणि ज्या काही महाराष्ट्राच्या परंपरा आहेत, त्या जागतिक पातळीवर जाव्यात, यासाठी मुंबई शहराची निवड केंद्र शासनाने केलेली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले

उद्योग मंत्री सामंत यांनी सांगितले की, या कार्यक्रमात ३३ देशांतील मंत्री व मंत्रीस्तरीय अधिकारी, तसेच १२० आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत. बॉलिवूड, टॉलीवूड, मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार व निर्मातेही कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या चार दिवसीय सोहळ्यात भारत पॅव्हेलियन, महाराष्ट्र पॅव्हेलियन, तेलंगणा पॅव्हेलियन तसेच अन्य संस्थांचेही पॅव्हेलियन उभारण्यात येणार आहेत. त्यांचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करणार आहेत. विविध क्षेत्रांतील परिसंवाद, राउंड टेबल कॉन्फरन्स, आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांचा समावेश असेल. विशेषतः तिसऱ्या दिवशी म्हणजे ३ मे रोजी नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर ए. आर. रहमान यांच्या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. “हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, औद्योगिक व पर्यटन क्षेत्राला जागतिक स्तरावर नेण्याची संधी आहे. या भव्य आयोजनासाठी राज्य शासनाला सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे,” असे आवाहनही उदय सामंत यांनी केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech