जम्मू : जम्मू आणि काश्मीरच्या कुपवाडा, उरी आणि अखनूर या सीमेवर ३० एप्रिल आणि १ मेच्या रात्री पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला. या भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) लागून येते. पाकिस्तानी चौक्यांवरून विनाकारण गोळीबार करण्यात आला. दरम्यान, भारतीय लष्कराने लगेच सडेतोड प्रत्युत्तर देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. भारतीय लष्कराच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा गोळीबार पूर्णपणे उद्देशहीन व शस्त्रसंधीचे उल्लंघन करणारा होता. पाकिस्तानकडून सातत्याने अशा प्रकारचे युद्धविराम उल्लंघनाचे प्रकार घडत असून, त्यात कोणत्याही प्रकारची प्रक्षोभक परिस्थिती नसतानाही सतत गोळीबार केला जातोय.
या गोळीबारात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. तरी खबरदारी म्हणून त्या भागात लष्कराने सुरक्षा वाढवली आहे. सीमारेषेवर तणावाचे वातावरण असून भारतीय लष्कर सातत्याने पहारा ठेवून आहे. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या कुरापतीला आपल्या जवानांनी शांतपणे पण ठामपणे उत्तर दिले. देशाच्या सीमांचे संरक्षण करणे आमचे कर्तव्य आहे आणि त्यासाठी आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही. लष्कराने त्या भागात अजून कडक बंदोबस्त ठेवला आहे. सीमेवर सतत तणाव असतोच, म्हणून भारतीय लष्कर नेहमी तयार असतं. देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत कुठलीही तडजोड केली जाणार नाही.