वनमंत्री गणेश नाईक यांचा जुन्या आठवणींना उजाळा
मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे तसे दिलदार व्यक्तिमत्त्व पण ते हलक्या कानाचे होते. याचा अनुभव मी घेतला आहे. मनात एक, पोटात एक, डोक्यात एक, असं त्यांच्या बाबतीत कधी घडलं नाही. ते स्पष्टवक्ता होते पण कोणी एखाद्याने त्यांचे कान भरले आणि ते त्यांना क्लिक झाले की ती गोष्ट ते मनात घर करून बसायची पण कालांतराने त्यांना त्यांची चूक कळली तर ती चूक कबूल करण्यात त्यांनी कधी संकोच बाळगला नाही. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा होता. अशी आठवण राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी वाशी येथील एका कार्यक्रमात सांगितली.
लोकसत्ताचे सहाय्यक संपादक विकास महाडिक यांच्या” एका आजीची गोष्ट” या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर, नवी मुंबई पालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे, लेखक प्रफुल्ल वानखेडे,ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष समर खडस, ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक अभय देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे उपस्थित होते. 19967 मध्ये राज्यात पहिल्यांदाच शिवसेना भाजप युती सरकार सत्तेवर आले होते. उद्योगपती धीरूभाई अंबानी यांच्या रिलायन्स उद्योग समूहात माझी कामगार संघटना कार्यरत होती.
या कंपनीवरून माझ्यात आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यात मतभेद आहेत. अशा प्रकारच्या बातम्या वर्तमानपत्रात येत होत्या. मला बाळासाहेबांनी मातोश्रीवर या संदर्भात बोलून घेतले. मी, बाळासाहेब ठाकरे त्यावेळीचे मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर जोशी आणि उद्धवजी ठाकरे अशी चौघांची बैठक झाली. मुख्यमंत्री जोशी यांनी मला काहीतरी लिहून दिले. बाळासाहेबांनी मला हे पत्र “प्रेसला दे” असे सांगितले. मी तिथून ते पत्र घेऊन बाहेर पडलो. गाडीत पत्र वाचल्यानंतर “मी हे पत्र प्रेसला देणार नाही” असे तात्काळ बाळासाहेबांना मोबाईल करून सांगितले. त्यांनी मला “तुला योग्य वाटेल ते कर” असे सांगून आग्रह धरला नाही. त्यानंतर माझ्याबाबतीत काय राजकारण झाले हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. बाळासाहेब ठाकरे धीरूभाई अंबानी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन हे चांगले मित्र होते. ते आठ पंधरा दिवसांनी धीरूभाई अंबानी यांच्या मुंबईतील घरात चर्चा करण्यासाठी भेटत होते. तेव्हा कधीतरी गप्पांच्या ओघात धीरूभाई अंबानी यांनी बाळासाहेबांना मला मुख्यमंत्री करा असे सुचवले.
बाळासाहेबांना हा प्रस्ताव आवडला नाही. अशा अनेक आठवणींना उजाळा नाईक यांनी आपल्या भाषणात दिला. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर बाळासाहेबांनी माझ्यावर गटनेतेपदाची जबाबदारी जबरदस्तीने टाकली. पक्षात इतर जेष्ठ नेते नेते असताना त्यांना डावलून मला गटनेते पद देणे मला आवडेले नाही. राजकारणात आलेली संधी सोडू नये असं म्हणतात. राजकारणात इतरांना टांग मारूनच पुढे जायचे असते असे सांगितले जाते पण माझ्यावर जे संस्कार झालेले आहेत तेथे अशा प्रकारे टांग मारणं मला कधी आवडलं नाही असा टोला नाईक यांनी मारला. आमच्या आगरी समजात स्वाभिमान फार जपला जातो. मला अनेक वेळा शिवसेनेत येण्याचा आमंत्रण दिले गेले पण मी गेलो नाही. बाळासाहेब आजारी पडले तेव्हा मात्र मी त्यांना पाहण्यासाठी कुटुंबासह गेलो. पक्षातून बाहेर पडलेल्यांना तेव्हा त्यांना भेटायचं धारिष्ट नव्हते. आम्ही गेलो कारण आमच्या मनात कोणतेही पाप नव्हते म्हणून आम्ही त्यांना भेटू शकलो. ठाकरे कुटुंबाविषयी आम्ही कधी वाईट बोललो नाही आणि बोलण्याची इच्छाही नाही. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवार यांच्याप्रमाणेच मलाही तीन मंत्री पद दिली होती. पक्षात इतरांना फक्त एकच मंत्रिपद दिले गेले होते. पवार यांच्याशीही आमची कोणतीही कुटता नाही.
आयुष्याच्या शेवटी आपण काय चांगले की वाईट केले हे आठवत असतं. मी कोणाबद्दलही कधी वाईट बोललो नाही. याचे मला समाधान आहे, असे नाईक यांनी सांगितले. प्रत्येक व्यक्तीने आपल्या आठवणी लिहून ठेवल्या पाहिजेत. संत तुकाराम महाराजांना सदेह वैकुंठाला नेण्यासाठी पुष्पक विमान आले होते. असा दाखला आहे. याचा अर्थ आपल्याकडे विमानाचा शोध फार पूर्वीच लागला होता. असा होतो. राइट बंधूंनी विमानाचा शोध लावला हे त्यांनी जगाला पटवून दिले. आपल्या लोकांनी ते लिहून न ठेवल्यामुळे राईट बंधू की लेफ्ट बंधू हे शेवटपर्यंत कळले नाही. लिहिण्याचं महत्त्व फार असल्याचं त्यांनी सांगितलं ग्लोबल वार्मिंगवर मी ग्लोबल वार्मिंग ते ग्लोबल कूलिंग असे पुस्तक लिहिण्यास माझ्या सहकाऱ्यांना सांगितले होते. पण ते प्रत्यक्षात येऊ शकले नाही. नवी मुंबईत 2000 नंतर कधीही मालमत्ता कर वाढला नाही. यापुढेही मालमत्ता करत कोणत्याही प्रकारची वाढ होणार नाही. असा शब्द मी नवी मुंबईकरांना देतो. असे त्यांनी सांगितले.
नवी मुंबई शहराला परमेश्वराचा आशीर्वाद आहे. त्यामुळे फ्लेमिंगो पक्ष केवळ नवी मुंबई आता दिसून येतात. ठाणे पनवेल मध्ये नाहीत. मुंबईतून ते हकलण्यात आले. या फ्लेमिंगो पक्षांचा अधिवास असलेला डीपीएस शाळेच्या मागील भूखंड विकण्याचा घाट सिडकोतील काही चक्रम अधिकाऱ्यांनी रचला होता तो आम्ही उधळून लावला.
सिडको आणि पालिकेत आजही भ्रष्ट व नालायक अधिकारी आहेत. त्यांनी वेळीच सुधरावे असा इशाराही नाईक यांनी दिला. मी भाजपमध्ये असलो तरी जात, पात, धर्म, पंथ, आणि पक्षाच्या पलीकडे विचार करणारा माणूस आहे. माणसाचं मृत्यू हा देखील आनंदमय झाला पाहिजे. अशी अपेक्षा नाही यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली.