नवी दिल्ली : वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातील परकीय व्यापार महासंचालनालयाने पाकिस्तानातून तयार होणाऱ्या किंवा निर्यात होणाऱ्या सर्व वस्तूंच्या भारतातील आयातीवर बंदी घालणारी अधिसूचना जारी केली आहे. यामुळे पाकिस्तानातून थेट किंवा इतर कोणत्याही व्यापारी मार्गाने वस्तूंची आयात प्रतिबंधित होईल. २ मे २०२५ रोजी जारी केलेल्या अधिसूचना क्रमांक ०६/२०२५-२६ द्वारे हा आदेश तात्काळ प्रभावाने लागू झाला आहे. त्यानुसार, परकीय व्यापार धोरण २०२३ मध्ये एक नवीन परिच्छेद २.२० अ समाविष्ट करण्यात आला आहे:
“पाकिस्तानातून उत्पन्न होणाऱ्या किंवा निर्यात होणाऱ्या सर्व वस्तूंची, मग त्या मुक्तपणे आयात करण्यायोग्य असोत किंवा अन्यथा परवानगी असलेल्या असोत, थेट किंवा अप्रत्यक्ष आयात किंवा पारगमन तात्काळ प्रभावाने, पुढील आदेश येईपर्यंत प्रतिबंधित करण्यात येत आहे. हा निर्बंध राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरणाच्या हितासाठी लागू करण्यात आला आहे.” तपशीलवार अधिसूचना परकीय व्यापार महासंचालनालयाच्या https://dgft.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.