राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

0

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग विकास धोरण निश्चित करण्यासाठी नेमलेल्या सरकारी समितीच्या अध्यक्षपदाचा उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सादर केला आहे. जानेवारी २०२५ पासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे राम नाईक यांना तीनदा दीर्घकाळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता प्रकृति स्थिर असली, तरी अजूनही संपूर्ण विश्रांतीचा वैद्यकीय सल्ला असल्याने राम नाईक यांनी हा राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे. राम नाईक यांचा मत्स्य व्यवसाय संदर्भातील प्रदीर्घ अनुभव व समितीपुढे आलेल्या सूचना यांमुळे मुख्यत्वे मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देणे ही काळाची गरज असल्याचे नाईक यांचे मत झाले होते.

योगायोगाने समितीचा अहवाल सादर करण्यापूर्वीच गेल्या महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने हाच निर्णय घेतला. त्यामुळे महत्त्वाचे काम झालेच आहे, धोरण निश्चिती संदर्भातील अन्य कामांना अधिक विलंब नको या हेतूने नाईक यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या राजीनामा पत्रात नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मत्स्योद्योग व बंदरे मंत्री नीतेश राणे यांचे आभारही मानले आहेत. प्रकृति अस्वास्थ्य असताना राजीनामा प्रत्यक्ष घेऊन येऊ नका मीच माझा प्रतिनिधि पाठवितो असे काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाईक यांना दूरध्वनीवर सांगितले. त्यानुसार आज त्यांच्यावतीने आलेल्या प्रतिनिधीकडे नाईक यांनी राजीनामा सुपूर्द केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम नाईक यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech