देहारादून : उत्तराखंडच्या गढवाला हिमालयीने क्षेत्रात स्थित असलेल्या जगप्रसिद्ध बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे आज, रविवारी सकाळी ६ वाजता भाविकांसाठी खुले करण्यात आले. निर्धारित वेळेत सकाळी ६ वाजता वैदिक मंत्रोच्चारात मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर विधिवत पूजा-अर्चा करण्यात आल्यानंतर देश-विदेशातून आलेल्या हजारो भक्तांच्या उपस्थितीत मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. या प्रसंगी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, भाजपचे महेंद्र भट्ट, टिहरीचे आमदार किशोर उपाध्याय हे उपस्थित होते. मंदिराचे दरवाजे सहा महिन्यानंतर खुले झाल्यानंतर भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मंदिराचे दरवाजे उघडण्यात आल्यानंतर ढोल-नगाड्यांचा निनाद करण्यात आला. यावेळी सेनेच्या बँडची मधून धून आणि हजारोंच्या संख्येने आलेल्या भाविकांचा ‘जय बदरी विशाल’ चा जयघोष यामुळे या ठिकाणी भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी मंदिराला १५ टन रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आले. यामुळे मंदिराच्या सौदर्यात आणखीनच भर पडली.परंपरेनुसार सकाळी बदरीनाथ धामचे मुख्य पुजारी रावल, धर्माधिकारी व वेदपाठींव्दारे मंदिरात पूजा-अर्चना करण्यात आली. यानंतर मंदिर विधी विधानाने माता लक्ष्मी यांना गर्भगृहातून बाहेर काढून मंदिराची परिक्रमा करून लक्ष्मी मंदिरात पुन्हा विराजमान करण्यात आले.
भगवान कुबेर आणि उद्धव यांच्या मुर्तींना पुन्हा बदरी विशाल मंदिरात विराजमान करण्यात आले. यानंतर भगवान बदरी विशाल यांच्या चतुर्भुज मुर्तीला विधिवत अभिषेक स्नान घालण्यात आले. यानंतर बद्रीनाथ यांचा आकर्षक श्रुंगार करण्यात आला. या यात्रेसाठी मुख्य मंदिराबरोबरच बद्रीनाथ धाम मंदिर परिक्रमेत असलेले गणेश, घंटकर्ण, आदि केदारेश्वर, आदि गुरु शंकराचार्य मंदिर आणि माता मूर्ती मंदिराचे दरवाजेही भाविकांसाठी उघडण्यात आले आहेत. मान्यतेनुसार, वर्षातील सहा महिने (उन्हाळा) मानव भगवान विष्णूची पूजा करतात, तर उर्वरित सहा महिने (हिवाळा) देव स्वतः भगवान विष्णूची पूजा करतात, ज्यामध्ये देवर्षी नारद हे मुख्य पुजारी असतात.
बद्रीनाथ धामचे दरवाजे खुले झाल्याने आता चारधाम यात्रेलाही अधिकृतपणे सुरूवात झालेली आहे. उत्तराखंड येथील गंगोत्री-यमुनोत्री तसेच केदारनाथचे दरवाजे या आधीच उघडण्यात आले आहेत. आता बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडल्याने चारधाम यात्रेला सुरूवात झाली आहे. चारधाम यात्रेसाठी भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, प्रशासनानेही जय्यत तयारी केली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्थानिक प्रशासनाने बद्रीनाथ धामची यात्रा सुरक्षित आणि अडथळ्यांविना होण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली आहे. प्रशासनाने भाविकांना कोणताही गोंधळ अथवा गडबड न करता रांगेतून दर्शन घेण्याचे आवाहन केले आहे.