सातारा : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ द्वारा महाबळेश्वर येथे आयोजित ‘महापर्यटन उत्सव-२०२५’ चा शानदार समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला. पर्यटन विकासासाठी पर्यटन विभागाने वर्षाभारतील पर्यटनाचे वेळापत्रक तयार करून त्यात राज्याच्या विविध भागात वर्षभरात आयोजित उत्सव सोहळ्यांचा समावेश करावा. यासोबतच देशातील टूर ऑपरेटर्स सोबत कार्यशाळा घेऊन त्यांना इथल्या पर्यटन सुविधांची माहिती द्यावी. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून एकाच पोर्टलवर सर्व पर्यटन सुविधांची माहिती द्यावी, असे प्रतिपादन यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
कार्यक्रमाला विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव (पाटील),आ. डॉ.अतुल भोसले, आ. सचिन पाटील, आदी उपस्थित होते. पर्यटन महोत्सवला उत्तम प्रतिसाद मिळाल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन करून मुख्यमंत्री म्हणाले, पर्यटन वाढीसाठी नागरी सुविधा आणि पर्यटन संस्कृती विकसित करणे गरजेचे आहे. पर्यटन संस्कृती विकसित करुन स्थानिकांचे सहकार्य पर्यटकांना सुखद अनुभव येण्यासाठी महत्वाचे आहे.
शौर्य आणि निसर्ग सौंदर्याचा सुंदर मिलाफ महाबळेश्वर येथे पाहायला मिळतो. निसर्गाने सुंदर पश्चिम घाट आपल्याला दिला आहे, ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा दिला आहे, अनेक सुंदर पवित्र तीर्थक्षेत्रे आपल्याकडे आहेत, हे सौंदर्य देश परदेशात पोहोचविण्याचे काम आपल्याला करायचे आहे आणि हा महोत्सव त्यादृष्टीने महत्वाचा आहे.
पर्यटनामुळे रोजगार निर्मितीला चालना : मुख्यमंत्री पुढे म्हणाले, उद्योग क्षेत्रात मोठी गुंतवणूक आल्यावर रोजगार निर्माण होतात. मात्र, पर्यटन क्षेत्रात कमी गुंतवणूकीत अधिक रोजगार निर्माण होतात. मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करण्याची क्षमता या व्यवसायात आहे. पर्यटन क्षेत्रात पाचव्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर येण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे. राज्याला पर्यटन क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आणण्याचे कार्य पुढील ५ वर्षात करण्यात येईल.
महाबळेश्वर हे देशातील उत्तम पर्यटनस्थळ : महाबळेश्वर हे देशातील सर्वोत्तम पर्यटनस्थळ असून त्याचे मोठ्या प्रमाणात मार्केटिंग करण्याची गरज आहे. महाबळेश्वर हे नवे गिरीस्थान म्हणून विकसित करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. पुढचा पर्यटन महोत्सव कोयानेच्या बॅक वॉटर परिसरात घेऊन तेथील संस्कृतीचा पर्यटकांना परिचय करून देण्यात येईल, असे फडणवीस म्हणाले.
पर्यटनाच्या क्षेत्रातील स्कुबा डायव्हिंगसारख्या नव्या कल्पना पुढे आणून राज्यातील पर्यटनाला चालना देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. कोयना बॅकवॉटर संबंधी असणारी बंधने दूर केल्याने तेथे चांगली पर्यटन व्यवस्था उभी राहत आहे. पुढील महापर्यटन उत्सव कोयना बॅकवॉटर क्षेत्रात घेण्यात येईल व पर्यटकांना या भागातील निसर्ग सौंदर्याचा आणि जल क्रीडांचा अनुभव घडविण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मुंबई येथे आयोजित वेव्हज परिषदेमुळे क्रिएटर्स इकॉनॉमिमध्ये महाराष्ट्र महत्वाची भूमिका अदा करेल, असा विश्वास व्यक्त करताना आपल्या सांस्कृतिक विविधता कंटेन्ट क्रिएटर्सच्या माध्यमातून जगभरात पोहोचविण्याचे प्रयत्न व्हावेत. पर्यटकाला स्थानिक वैशिष्ठ्याचा परिचय करून दिल्यास पर्यटक त्या त्या भागाकडे वळेल आणि पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाबळेश्वर निसर्गाने समृद्ध असून पर्यटनाची अमर्याद क्षमता इथे आहे. मुनावळे येथे जलपर्यटनालाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. पर्यटकांना इथल्या निसर्गासोबत इथल्या कला, संस्कृती, इतिहास आणि खाद्यपदार्थांचा आनंद घेता येईल. इथल्या भूमीपुत्राला पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होईल आणि आपल्या कुटुंबासोबत भूमातेची सेवा करण्याची संधी मिळेल. तीन दिवसात महोत्सवला पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून इथल्या पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्य शासनाने लोकाभिमुख योजनांना चालना देण्यासोबत गड किल्ले संवर्धनाला चालना देण्याचे कार्य केले. पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी देखील प्रयत्न होत आहेत. भिलार येथे पुस्तकांचे गाव, मांघर येथे मधाचे गाव आहे. इथे सर्वोत्तम स्ट्रॉबेरी उत्पादन होते, वेण्णा लेकचे सौंदर्य आहे, लोकसंस्कृतीचे विविध रंग आहेत. हे सर्व एकच ठिकाणी आणण्याचे काम महापर्यटन उत्सवाच्या माध्यमातून झाले आहे. अत्यंत नेटके नियोजन आणि सुरक्षित पर्यटन यामुळे हा महापर्यटन उत्सव वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. महाबळेश्वरला नवे आणि सुंदर पर्यटनस्थळ म्हणून विकसित कारण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
विधान परिषदेचे सभापती प्रा. शिंदे म्हणाले, महाबळेश्वर हे पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण आहे. महापर्यटन उत्सवाला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद लाभल्याने महोत्सवाचा विस्तार करून पुढल्यावर्षी अधिक पर्यटक येतील याचा प्रयत्न व्हावा. पर्यटन क्षेत्रातील अभिनव कल्पना या महोत्सवात पाहायला मिळाल्या. परदेशातील पर्यटनाच्या उत्तम संकल्पनादेखील पर्यटन विभागाने स्वीकाराव्यात, अशी सूचना त्यांनी केली.
प्रस्ताविकात पर्यटनमंत्री शंभुराज देसाई म्हणाले, महापर्यटन उत्सवाचा हा पहिलाच प्रयत्न होता. महोत्सवाला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता राज्यातील प्रत्येक विभागात दरवर्षी पर्यटन महोत्सव घेण्यात येईल. या माध्यमातून त्या विभागातील पर्यटनस्थळे, वैशिष्ट्ये याचे ब्रँडिंग करण्यात येईल. पर्यटन विकासाला मोठी संधी आहे. मुनावळे येथील पर्यटन सुविधांच्या माध्यमातून पर्यटकांना आकर्षित करण्यात यश येईल. कोयानेच्या बॅक वॉटरमध्ये पर्यटन विकासाचा आराखडा तयार करून पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. तीन दिवसाच्या महापर्यटन महोत्सवात ७५ हजार पेक्षा अधिक पर्यटकांनी सहभाग घेतला. शिवकालीन शास्त्र, छायाचित्र प्रदर्शन, खाद्य जत्रा, महाराष्ट्राचा बाज असलेले कार्नीव्हल परेड, लेझर आणि ड्रोन शो, हेलिकॉप्टर राईड, किल्ले आणि शस्त्रास्त्र प्रदर्शन, खाद्य जत्रा, लेझर आणि ड्रोन शो, लोककला अशा विविध उपक्रमांना पर्यटकांचा प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
महोत्सवासाठी स्थानिकांचे चांगले सहकार्य मिळाल्याचेही देसाई म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मुनावळे येथे शिवसागर जलशयातील १० जेट स्कीचे लोकार्पण करण्यात आले. पर्यटन महोत्सवला सहकार्य करणाऱ्या क्लब महाबळेश्वरच्या अध्यक्ष मनीषा गोखले यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.