नवी दिल्ली : पाकिस्तानने भारतावर केलेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरातील भारतीय कारवाईत लाहोर येथील पाकिस्तानचे मिसाईल डिफेन्स सिस्टीम उध्वस्त झाले आहे. दिल्लीत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात ही माहिती पुढे आली आहे. दरम्यान पाकिस्तानला जशास-तसे उत्तर दिले जाईल असे भारताने स्पष्ट केले आहे.
भारताने बुधवारी पहाटे केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तानातील दहशतवादी तळं उध्वस्त केली आहेत. भारताने आज, गुरुवारी केलेल्या कारवाईत पाकिस्तानात विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या एअर डिफेन्स रडार सिस्टीमला लक्ष्य केल्याची माहिती या निवेदनात देण्यात आली आहे. या कारवाईत पाकिस्तानच्या लाहोर शहराजवळील एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त झाली आहेत. भारतीय लष्कराच्या या कारवाईमुळे पाकिस्तानच्या हवाई कारवाया मोठ्या प्रमाणावर थोपवून धरण्यास मदत होणार आहे.
पाकिस्तानकडून ७ आणि ८ मे च्या मध्यरात्री उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी ठिकाणांवर हल्ले करण्याचे प्रयत्न झाले. त्यात अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कापुरथला, जलंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नाल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज या १५ शहरांचा समावेश आहे. पाकिस्तानकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून हे हल्ले करण्यात आले. इंटीग्रेटेड काऊंटर यूएएस ग्रिड आणि एअर डिफेन्स सिस्टीमच्या मदतीने पाकिस्तानचे हे प्रयत्न हाणून पाडण्यात आले. हे पाकिस्तानचेच हल्ले असल्याचे या ड्रोन व क्षेपणास्त्रांच्या अवशेषांवरून स्पष्ट होत असल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, भारतीय संरक्षण मंत्रालयाने पाकिस्तानच्या या आगळिकीवर इशारा दिला आहे. पाकिस्तानच्या या प्रयत्नात १५ निरपराध नागरिकांचा हकनाक बळी गेला आहे. त्यात 3 महिला आणि ५ लहान मुलांचा समावेश होता. पाकिस्तानकडून होणारा हा हल्ला रोखण्यासाठी भारताला प्रत्युत्तर देणं भाग पडल्याचे भारताने म्हंटले आहे.