शहीद जवान राकेश शिंदे यांच्या मातेस मांडवेदिगर येथे २ हेक्टर शेतीयोग्य जमीन प्रदान

0

जळगाव : जम्मू-काश्मीरमधील ऑपरेशन रक्षक (दि. २७ फेब्रुवारी २०००) दरम्यान शौर्याने लढताना वीरमरण आलेले जवान राकेश काशिराम शिंदे (रा. कुर्‍हे पानाचे, ता. भुसावळ) यांच्या मातोश्री अनुसयाबाई काशिनाथ शिंदे यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने मांडवेदिगर (ता. भुसावळ) येथे २ हेक्टर शेतीयोग्य कृषिक जमीन प्रदान करण्यात आली.

या भावनिक आणि प्रेरणादायी प्रसंगी आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री मा. गुलाबराव पाटील व केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांच्या हस्ते जमिनीचा अधिकृत प्रदान आदेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी खासदार स्मिता वाघ, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह प्रशासनाचे विविध अधिकारी उपस्थित होते.

या वेळी बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले,“शहीद जवानाच्या मातेस दिलेला हा सन्मान केवळ आर्थिक मदत नसून, त्यांच्या देशसेवेच्या त्यागाची शासनाकडून दिली गेलेली कृतज्ञतेची नम्र भावांजली आहे.” कार्यक्रमात भावना व्यक्त करताना वीरमाता अनुसयाबाई शिंदे म्हणाल्या,“मुलगा देशासाठी गेला, पण शासनाने त्याच्या बलिदानाची दखल घेतली, याचा अभिमान वाटतो. ही जमीन आम्हाला त्याच्या आठवणी जपण्यासाठी नवसंजीवनी देईल.” कार्यक्रमास तालुका प्रशासनाचे अधिकारी, ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते तसेच शहीद जवानांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech