६ मे २०२५ रोजी रात्री दीड वाजताच्या सुमारास भारतीय सैन्य दलाने हवाई हल्ला करून पाकव्याप्त काश्मीरच्या दहशतवादी अड्ड्यांना पूर्णपणे उध्वस्त केले. यावेळी दहशतवाद्यांच्या नऊ अड्ड्यांवर भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राइक केला. भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांनी मिळून हे सर्जिकल स्ट्राइक ऑपरेशन यशस्वी केले. सात तारखेला दिवसभर सर्व भारतीय न्यूज चैनलने ही बातमी जनतेपर्यंत पोहोचवली. ही बातमी ऐकल्यानंतर प्रत्येक भारतीयाच्या मनात आनंदाची लाट उसळली कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवस-रात्र विचारांचे सत्र सुरू ठेवत. भारतीय सैन्य दलाला प्रोत्साहित करत त्यांना कृतीबद्ध आराखडा तयार करण्यासाठी मोकळीक दिली. म्हणून हे ऑपरेशन काही मिनिटात यशस्वी झाले. या ऑपरेशनचे नाव खूपच प्रेरणादायी होते. ज्या भारतीय स्त्रीने आपल्या डोळ्या देखत पतीला दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मरताना पाहिले. त्या २७ स्त्रियांना आणि त्यांच्या मुला मुलींना या ऑपरेशन सिंदूरमुळे समाधान वाटले. ही या बातमीतली सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. या ऑपरेशन सिंदूरच्या यशात कर्नल सोफिया कुरैशी आणि. विंन कमांडर व्योमिका सिंह ह्या दोन रणरागिनींची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांनी त्या २७ भारतीय. भगिनींना न्याय दिला आणि पुसल्या गेलेल्या भारतीय सिंदूराचा बदला घेतला.
२२ एप्रिलला ज्यावेळी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम भागात हा दहशतवादी कट घडवला गेला. त्यानंतर प्रत्येक भारतीय नागरिक मनातून व्यथित झाला होता, त्यावेळी प्रत्येकाला असे वाटत होते. लवकरात लवकर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर हल्ला चढवावा. त्यातून २७ निरापराध नागरिकांना न्याय द्यावा. कारण या २७ जणांच्या बायकांना दहशतवाद्यांनी सांगितले होते. तुमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम्हाला बदनाम केले आहे. त्याची ही सजा तुम्हाला भेटत आहे! हे वाक्य खूप त्रासदायक होते, त्या वाक्यामागे धर्मांधपणा होता. म्हणजे तुम्ही हिंदू आहात का आणि तुम्ही हिंदू असाल तर आम्ही तुम्हाला मारून टाकतो. त्यामुळे हा भारताचा सरळ सरळ अपमान होता. तसाच तो पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही अपमान होता. त्यामुळे आपल्या देशातील जनता मनातून अस्वस्थ झाली. राजकीय विरोधी पक्षांनीही त्यावेळी भारत सरकारला पाठिंबा जाहीर केला परंतु तरी देखील नरेंद्र मोदी सरकारवर आक्षेप व्यक्त होत होता. इतके दिवस झाले तरी मोदी साहेब अजून गप्प कसे? त्यांनी लवकरात लवकर काहीतरी केले पाहिजे! अखेर विचारपूर्वक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवीन रणनीती आखून, अगदी गुप्तपणे त्यांनी हा यशस्वी निर्णय घेतला. त्याचा परिणाम म्हणून सात तारखेचा सूर्य भारतीय जनतेसाठी आनंद घेऊन आला. त्यातून दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या 27 नागरिकांना न्याय मिळाला. ही भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात होती.
या सर्जिकल स्ट्राइक मुळे भारतीय सेनेने पुन्हा एकदा पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणला. पाकिस्तान या देशातच जागतिक दहशतवादाचे प्रमुख केंद्र आहे हे यातून सर्वांना दिसून आले. पाकिस्तान हा देश फार गरीब आहे, त्या देशात खाण्यापिण्याचे वांदे आहेत. तरी हा देश दहशतवाद्यांना कसा काय पोसतो हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. म्हणून भारतीय सैन्याने पाकिस्तान लष्करावर कोणताही हल्ला न करता थेट दहशतवादी तळांवर हल्ला चढवला. त्यातून आपल्या सैन्याने पाकची दानवी दहशतवादी शक्ती खंडित केली. या सर्वातून भारताची मानवतावादी रणनीती दिसून येते. ज्या दहशतवाद्यांवर टार्गेट करायचे त्याच दहशतवाद्यांवर भारतीय सैन्याने टार्गेट केले. यात पाकिस्तानच्या कोणत्याही सामान्य नागरिकाला अथवा लष्कराला मारायचे नाही असा विचार.. भारताने केला होता. भारत हा देश आणीबाणीच्या युद्धजन्य परिस्थितीतही शत्रु देशाच्या नागरिकांचा विचार करतो. हे भारताचे मानवतावादी मूळ तत्व आहे. जगातल्या सर्व देशांनी या आदर्शला मानवंदना देऊन भारताला सातत्याने सहकार्य द्यावे हे गरजेचे आहे. कारण भारत हा देश सर्वात आधी विश्व कल्याणाचा विचार करतो. युद्धप्रसंग आला तरी भारतीय सेनेच्या मनात बुद्ध असतो हे भारताचे वैशिष्ट्य आहे. ते इथे पुन्हा अधोरेखित झाले आहे. तरीही पाकिस्तानच्या कारवाया थांबत नाहीत. त्यामुळे भारताने ऑपरेशन सिंदूर चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय इतिहासाला दहशतवाद हा नवा नाही. नवव्या शतकापासून भारताला दहशतवाद्यांशी सामना करावा लागला आहे. भारत हा देश परकीय धर्मांध इस्लामिक आक्रमकामुळे एक हजार वर्ष गुलामगिरीत खितपत पडला होता. पुढे सोळाव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य नावाची क्रांती घडवली. त्यातून त्यांनी इस्लामिक धर्मांध परकीय आक्रमकांना कायम धूळ चारली. मग बघता बघता छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचा एक विचार झाले. त्यातून महाराष्ट्र धर्माचा उदय झाला. हा महाराष्ट्र धर्म म्हणजे राष्ट्रधर्म होय. या वैचारिक क्रांतीतून अठराशे अठरापर्यंत, सव्वाशे वर्ष मराठा सत्ता भारतावर छत्र ठेवून होती. त्यांनी मोघलांना नामधारी बादशाही दानात दिली होती. हे सर्व होऊन गेल्यावर आज बऱ्याच वर्षाने पुन्हा एकदा स्वराज्याचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागृत केला आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात आपण पाहिले असता, शिवरायांनी अफजल खानाचा वध करताना नाट्यमय रणनीती आखली. शाहिस्ते खानाला मारताना त्यांनी लाल महाला वर सर्जिकल स्ट्राइक केला. सुरत या मोगल व्यापारी बंदरावर छापा टाकताना सुरतला शिवरायांनी पूर्णपणे घेरले तरी ही मोगल व्यापारी शरण आले नाहीत. म्हणून शेवटी शिवाजी महाराजांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. त्या हल्ल्यात औरंगजेबाची अर्धी सुरत जाळली परंतु सामान्य जनतेला शिवशाहीच्या सैन्याने हात लावला नाही. तेच भारतीय सैन्याने सहा मे च्या रात्री करून दाखवले. हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विचारांचा विजय आहे.
हा एक विजय भारतासाठी केवळ एक सुरुवात आहे. ही झुंज अजूनही संपलेली नाही. इथून पुढे आपल्याला अजून
सतर्क राहून जागतिक राजकारण चालवायचे आहे. जे देश सध्याच्या काळातही दहशतवादाला पोसत आहेत. त्या सर्वांच्या विरोधात एक मानवतावादी देशांचा संघ भारताने जागतिक व्यासपीठावर एकजूट करायला हवा. त्यातून आपल्याला या दहशतवादाचा समूळ विनाश घडवता येईल. त्यासाठी आपण सर्वांनी एक भारतीय म्हणून तयार व्हायला हवे. , सत्ताधारी, विरोधी, जात धर्म, संस्कृती, वर्ण या सर्व स्वार्थी विचारांना आपण सोडून द्यायला हवे. कारण प्रत्येक भारतीय नागरिक ज्यावेळी देशाबाहेर पाऊल ठेवतो तेव्हा तो फक्त आणि फक्त भारतीय असतो. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यातही आपल्याला तेच दिसून आले आहे.
शेवटी आपण सर्वजण भारतीय आहोत आणि भारतच आपली एकमेव ओळख आहे. ती ओळख आपण आता खऱ्या अर्थाने समजून घेतली पाहिजे. एवढेच या लेखातून शेवटी म्हणावेसे वाटते.
अॅड रुपेश पवार
मो. ९९३०८५२१६५