मुंबई : भगवान गौतम बुद्धांनी जगाला दिलेला अहिंसा आणि विश्वशांतीचा विचार जगाला तारणारा आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन देणारा, अतः दीप भव अर्थात स्वयंप्रकाशित होण्याचा संदेश देणारा, प्रज्ञा शील करुणेची शिकवण देणारा बहुजन हिताय बहुजन सुखाय ची संकल्पना मांडून जगाला लोकशाही शिकविणारा बौद्ध धम्म आदर्श जीवनमार्ग आहे. तथागत भगवान बुद्ध शास्ता असून त्यांचा धम्म संपूर्ण आशिया खंडाने आणि जगभरातील ८० देशांत स्वीकारला गेला आहे. जगाला बुद्ध विचार विश्वशांतीचा विचार हवा आहे. विश्वशांतीचा पहिला विचार भारतातून भगवान बुद्धांनी जगाला शिकवला याचा आम्हाला अभिमान आहे, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज केले.
महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांची उद्या जयंती असून बुद्ध पौर्णिमे निमित्त रामदास आठवले यांनी सर्व भारतीयांना शुभेच्छा संदेश पाठवला आहे. रामदास आठवले हे बुद्ध जयंतीच्या पार्श्वभूमीवर तीन बौद्ध राष्ट्रांच्या दौऱ्यावर आहेत. व्हिएतनामला भेट दिल्यानंतर त्यांनी कंबोडिया येथे दौरा केला असून उद्या बुद्ध पौर्णिमे निमित्त थायलॅन्ड मधील बँकॉक येथील धम्मकाया बुद्धविहाराला भेट देणार आहेत. कंबोडिया येथील बुद्धविहार आणि कंबोडियाचे राजे नोरोडोम सिंहामोनी यांच्या राजमहाल ला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सपत्नीक भेट दिली.
कंबोडिया येथे भारताचे ॲम्बेसेडर वनलालवावणा बावितलुंग यांनी कंबोडिया येथे रामदास आठवले यांची भेट घेऊन कंबोडियाची माहिती दिली. रामदास आठवले हे व्हिएतनाम कंबोडिया थायलँड या बौद्ध राष्ट्रांच्या दौऱ्यावर आहेत. उद्या सोमवार १२ मे रोजी बुद्धजयंतीचा महोत्सव आठवले थायलँड बँकॉकमधील जगप्रसिद्ध धम्मकाया बुद्धविहार आणि वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टच्या बुद्धविहार येथे साजरी करणार आहेत.