मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करंजे येथे गोवर्धन गोशाळेचे उदघाटन
सिंधुदुर्ग : नारायण राणे यांनी कणकवलीत उभी केलेली गोवर्धन गोशाळा ही कोकणातील शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धी प्राप्त करून देणारे केंद्र आहे. देशी गायीपासूनच शेतकऱ्यांना समृद्धीकडे नेता येणार आहे. त्याअनुषंगाने गोधन वाढ, चाऱ्यासाठी अनुदान तसेच नैसर्गिक शेती वाढावी यासाठी आम्ही विविध योजना आखत आहोत. यात राणेंचा गोवर्धन गोशाळा हा प्रकल्प महाराष्ट्रासाठी पथदर्शी ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला. करंजे येथील गोवर्धन गोशाळेचे उद्घाटन फडणवीस यांनी केले. यावेळी उपमु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्यासह आमदार दिपक केसकरकर, भाजपचे कार्याध्यक्ष रवींद चव्हाण, आमदार निलेश राणे, रवींद्र फाटक, प्रमोद जठार, अभिराज राणे, निमिश राणे, राजन साळवी, प्रभाकर सावंत, दत्ता सामंत, श्वेता कोरगावकर, संदेश सावंत, मनीष दळवी, संजय पडते, अशोक सावंत, समीर नलावडे आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, ही फक्त गोशाळा नाही तर गोसंवर्धन केंद्र आहे. शेतकऱ्यांच्या विकासाचे, शेतकऱ्यांची आर्थिक समृद्धी प्राप्त करून देणारे केंद्र आहे. सर्वांचं संवर्धन असणारं हे केंद्र आहे. कृषी संस्कृतीमध्ये गोमातेला दुसरा पर्याय नाही. गायी होत्या. त्यावेळी कृषी संस्कृती उच्च दर्जावर होती. गाय ही देणारी आहे. दूधापासून शेणापर्यंत आर्थिक उत्पन्न मिळवून देत असते. महाराष्ट्राचा इतिहास पाहिला तर ज्या भागामध्ये गोधन कमी झालं, त्या भागामध्ये आत्महत्या वाढलेल्या दिसून येतात. गोवर्धन गोशाळा तयार करण्यापूर्वी देशभरातील शंभरहून अधिक गोशाळा पाहिल्या. इथली जागा पहायला आल्या, त्यावेळी वाघाचं दर्शनही झालं आणि मला पाहून तो पळाला. राणे पुढे म्हणाले, देशभरातील विविध जातीच्या गायी आम्ही इथे अाणल्या आहेत. पण गाय आणली म्हणजे भरभराट होईल हा हेतू नसून, इथल्या शेतकऱ्यांची भरभराट व्हावी. कोणती जात जास्त दूध देतं, त्यांचं व्यवस्थापन कस असतं हे इथल्या शेतकऱ्यांना समजावं यासाठी ही गोशाळा तयार केली आहे. शेणापासून गॅस, शेणखत आणि रंगही तयार करणार आहोत. गोमूत्र आठ रुपये लीटर विक्री करणार आहोत. शेतकऱ्यांकडून ही शेण, गोमूत्राची खरेदी केली जाणार आहे, असेही राणे यांनी सांगितले.
ते म्हणाले, आर्थिक उत्पन्न मिळवून देणारी पिकं आली. त्यात केमीकल आल. यातून काही काळ उत्पादकता वाढली. पण हळूहळू उत्पादकता कमी झाली. शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी नैसर्गिक शेतीकडे वळले आहेत. त्यामुळे गायींच महत्व वाढलं आहे. शेणाचा वापर ज्या शेतीमध्ये होतोय, तेथील उत्पादकता दीड पटीने वाढली आहे. सध्या पंचवीस लाख हेक्टर क्षेत्रात नैसर्गिक शेती करण्याचे धेय्य आम्ही ठेवलं आहे. पण गोमाता नसेल तर नैसर्गिक शेती होणार नाही. त्यामुळे गोधन वाढवावं यासाठी प्रोत्साहन आहे. चाऱ्यासाठी अनुदान देण्याची योजना अाणली आहे. आपल्या देशी गायी सर्वोत्तम होत्या आणि आहेत. इथल्या गायी ब्राझील देशाने नेल्या आणि तेथे संवर्धन केले. आज त्याच गायी अापण तेथून आणत आहोत. ते म्हणाले, देशी गायींचे संवर्धन करूनच आपण शेतकऱ्यंांना समृद्धतेकडे नेऊ शकतो. शेणावरचा चांगला रंग तयार होतो. शेणापासून रंग तयार होण्यासाठी प्रोत्साहन देणार आहोत. तर राणेंचा प्रकल्प पाहिल्यानंतर प्रत्येकाला प्रकल्प उभारणीची प्रेरणा मिळेल. आम्हीही संपूर्ण महाराष्ट्रात यासाठी प्रयत्न करत आहोत.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राणे हे काम किंवा प्रकल्प हाती घेतात तो यशस्वीरित्या पूर्ण देखील करतात. त्यामुळे करंजे येथील गोवर्धन गोशाळा ही सिंधुदुर्गच्या विकासाचे मॉडेल ठरणार आहे या गोवर्धन गोशाळेमध्ये भाकड गायींची व्यवस्था केली आहे. हे खरे तर पुण्याचे काम आहे. आता भाकड गायी कसायाकडे जाणार नाहीत. तर गोवर्धन प्रकल्पातून काही वर्षात या धवलक्रांतीतून शेतकऱ्यांचा विकास होईल. गोवर्धन गोशाळा हा आगळा वेगळा प्रकल्प आहे. शेतकऱ्यांना दिशादर्शक असा हा प्रकल्प असणार आहे. राणे जे काम किंवा जो प्रकल्प हातात घेतात तो पूर्ण करतात. सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांची आर्थिक समृद्धी व्हावी. प्रत्येक शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं यासाठी गोवर्धन गोशाळेचा प्रकल्प आम्ही उभा केला आहे. सध्या जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न अडीच लाख रूपये आहे. ते आम्ही वर्षभरात साडे तीन लाख रूपयापर्यंत नेणार आहोत, अशी ग्वाही माजी केंद्रीयमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी यावेळी बोलताना दिली.