मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावामुळे आयपीएल २०२५ स्पर्धा स्थगित करण्यात आली होती.पण आता दोन्ही देशात शस्त्रसंधी झाली आहे.१२ मे रोजी दोन्ही देशांच्या डीजीएमओ यांच्याच चर्चा होणार आहे. त्यामुळे सध्यातरी युद्धविराम लागला आहे. अशात आता एकच आठवड्यांसाठी आयपीएल स्थगित झाल्याने पुन्हा बीसीसीआय उर्वरित आयपीएल लगेचच सुरू करणार का? असा प्रश्न आहे.
आयपीएल स्थगित झाल्यानंतर परदेशी खेळाडू आपापल्या मायदेशी परतले आहे. भारतीय खेळाडू देखील त्यांच्या घरी गेले आहेत. त्यामुळे जर आता पुन्हा आयपीएल लगेचच येत्या आठवड्यात सुरू करायंच झाल्यास पुन्हा प्रत्येक फ्रँचायझीला आपल्या संघाला एकत्र करावे लागणार आहे. हे मोठे आव्हान दोन्ही संघांसमोर असणार आहे. इतकेच नाही, तर आयपीएल २०२५ नंतरचे क्रिकेटचे वेळापत्रकही व्यग्र होते. २५ मे रोजी आयपीएल २०२५ स्पर्धेचा अंतिम सामना होणार होता. त्यानंतर भारतीय कसोटी संघाला २० जूनपासून इंग्लंडमध्ये ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्याच आठवड्यात भारतीय संघ इंग्लंडला जाणे अपेक्षित आहे.
तसेच या कसोटी मालिकेपूर्वी इंग्लंडमध्ये भारतीय अ संघ प्रथम श्रेणी सामने खेळणार होता. अशात आयपीएल २०२५ स्पर्धा एक आठवडा जरी पुढे गेली, तरी पुढील सर्व वेळापत्रकावर त्याचा परिणाम होऊ शकतो. अशात आता आयपीएलच्या आयोजनाबाबत बीसीसीआय काय निर्णय घेणार हे पाहावे लागणार आहे.
दरम्यान, ८ मे रोजी पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले करण्यात आल्यानंतर भारताकडूनही त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आले होते. त्याच दरम्यान पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात धर्मशाळा येथे सामना सुरू होता. मात्र हा सामना १०.१ षटकानंतर रद्द करण्यात आला होता.सामना सुरू असतानाच अचानक आधी सामना थांबवण्यात आला आणि त्यानंतर फ्लडलाईट्स बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर खेळाडू, प्रेक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना सुखरुप स्टेडियमबाहेर काढण्यात आले होते.
त्यानंतर ९ मे रोजी बीसीसीआयने जाहीर केले होते की सुरक्षेच्या कारणाने एक आठवड्यासाठी आयपीएल स्थगित केले जात आहे. यानंतर खेळाडू आपापल्या घरी परतले होते. पण आता असे समोर आले आहे की १० मे रोजी संध्याकाळी ५ वाजल्यापासून युद्धविराम लागला आहे.त्यामुळे आता आयपीएल चालू होणार की नाही यावर बीसीसीआय काय निर्णय घेणार हे पाहणे लागणार आहे.