नवी दिल्ली : एकीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धविराम केल्याचे अमेरिकेकडून जाहीर करण्यात आले. मात्र त्यानंतरही पाकिस्तानकडून भारतावर हल्ले सुरूच राहिले. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज, रविवारी एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या महत्वपूर्ण बैठकीत मोदींनी ‘पाकिस्तानकडून गोळी आली, तर आपल्याकडून गोळ्याने उत्तर द्यायचं’ असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, तिन्ही सेवा दलांचे प्रमुख उपस्थित होते.
पंतप्रधान मोदींनी बैठकीत स्पष्ट केले की, ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही. जर त्यांनी गोळीबार केला, तर आपणही गोळीनेच उत्तर द्यायचं. त्यांनी हल्ला केला, तर आपणही हल्ल्यानेच उत्तर द्यायचं. वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा. त्यांच्या हवाई तळांवरील हल्ले, हा या ऑपरेशनमधील निर्णायक क्षण होता, असे ते म्हणाले. बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयावरील सर्वात घातक हल्ला होता. सगळ्यात शक्तिशाली अस्त्र त्यासाठी वापरले गेले. जैश-ए-मोहम्मदची निर्मिती आयएसआयने केलेली आहे आणि भारताने त्यांना हा महत्त्वाचा मेसेज दिला.
डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स १२ मे रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. मात्र, पाकिस्तानने गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याबाबत दोन्ही देशांच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्समध्ये झालेल्या समजुतीचे उल्लंघन केले आहे. भारतीय सैन्याने त्याचा बदला घेतला आणि सीमा अतिक्रमणाचा सामना केला, असे भारताने शनिवारी म्हटले आहे. एका विशेष पत्रकार परिषदेत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, हे आज झालेल्या समजुतीचे उल्लंघन आहे आणि भारत या उल्लंघनांची गंभीर दखल घेतो.