शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुढील पिढ्यांसाठी स्फुर्तीदायक – मुख्यमंत्री

0

छत्रपतींच्या राजकोट येथील पुतळ्याचे दर्शन व पूजन
सिंधुदुर्ग : छत्रपती शिवाजी महाराज हे महान योध्दा होते. त्यांचे विचार सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने विक्रमी वेळेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वास साजेसा भव्य पुतळा उभारला असून महाराजांचा हा पुतळा पुढील पिढ्यांना स्फुर्तीदायक ठरणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन व पूजन समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री नितेश राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार नारायण राणे, विधान परीषद सदस्य निरंजन डावखरे, विधान सभा सदस्य दीपक केसरकर, रविंद्र चव्हाण, निलेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक दिवे, प्रभारी पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता किणी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाने विक्रमी वेळेत ह्या पुतळ्याचे काम पुर्ण करुन महाराजांच्या कर्तृत्वास साजेसा भव्य पुतळा उभारला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच यंत्रणांनी अतिशय वेगाने काम केले आहे. ज्येष्ठ मूर्तीकार राम सुतारांनी कमी वेळेत आकर्षक आणि देखणा पुतळा साकारला आहे. आय.आय.टी.,जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे देखील पुतळा उभारणीत मोलाचे योगदान लाभले असून मी सर्वांचे अभिनंदन करतो. पुतळा उभारताना कोकणातील वेगवान वारे व वादळांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची पाहता हा महाराजांचा बहुदा देशातील सर्वात उंच पुतळा ठरेल. या पुतळ्याची भव्यता लक्षात घेता पुतळ्याच्या आसपासचा परिसर विकसित करुन पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. कोकणच्या विकासाला नेहमीच प्राधान्य दिलेले आहे. पर्यटनाच्या दृष्टीने कोकणचा अधिकाधिक विकास करणार असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शिवप्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भव्य पुतळा अभिमान, स्वाभिमान आणि शौर्याचे प्रतीक आहे. हा पुतळा इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी आणि शिवभक्तांसाठी एक आदराचं स्मारक ठरणार असल्याचेही ते म्हणाले. प्रारंभी मुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते शिवआरती करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिकात्मक मुर्तीचे पूजन देखील करण्यात आले. यावेळी आकर्षक रंगांमध्ये फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ज्येष्ठ मूर्तीकार अनिल सुतार, बांधकाम विभागाचे अधिकारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

पुतळा उभारणी विषयी
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ३१ कोटी ७५ लाख रकमेतून हा पुतळा उभारण्यात आला आहे. ज्येष्ठ मूर्तीकार राम सुतार यांच्या कंपनीमार्फत हे काम पूर्ण करण्यात आले आहे. पुतळा उभारण्याचे काम ईपीसी तत्त्वावर झालेले आहे. तलवारधारी पुतळ्याची उंची ६० फूट इतकी असून संपूर्ण पुतळा ब्राँझ धातूमध्ये उभारण्यात आलेला आहे. पुतळ्याच्या आधारासाठी स्टेनलेस स्टील सपोर्ट फ्रेमवर्क करण्यात आले आहे . तसेच चौथऱ्यासाठी M50 या उच्च दर्जाचे काँक्रीट व स्टेनलेस स्टील सळईचा वापर करण्यात आलेला आहे. या पुतळ्याचे संकल्पन आयआयटी मुंबई या संस्थेकडून तपासून घेण्यात आलेले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech