मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ३६ वर्षीय कोहलीने आपल्या इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर करत ही घोषणा केली, ज्यामध्ये त्याने आपल्या १४ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीतील अनुभव आणि शिकवणीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्याच्या निवृत्तीमुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. कोहलीने आपल्या निवृत्तीच्या घोषणेत कसोटी क्रिकेटमधील प्रवासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्याने म्हटले की, माझं मन कृतज्ञतेच्या ओलाव्यानं भरून आलंय. या सुंदर खेळासाठी, ज्या सहकाऱ्यांसोबत मी प्रत्येक लढाई लढलो त्यांच्यासाठी आणि त्या प्रत्येक व्यक्तीसाठी ज्यांनी या प्रवासात मला साथ दिली, माझी ओळख जपली. माझ्या कसोटी क्रिकेटच्या या सोनेरी दिवसांकडे मी नेहमीच हसून पाहणार आहे. “मी कसोटी क्रिकेटला सर्व काही दिलं आणि त्याने मला अपेक्षेपेक्षा अधिक दिलं.” त्याने आपल्या कारकिर्दीतल्या आठवणी आणि शिकवणूक यांचा उल्लेख केला.
कसोटी कारकिर्द : विराटने २०११ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने कसोटी क्रिकेटच्या कारकिर्दीत एकूण १२३ कसोटी सामने खेळले. त्यात ९,२३० धावा केल्या. त्याचा सरासरी ४६.८५ होता. यामध्ये ३० शतके आणि ३१ अर्धशतकांचा समावेश आहे. कर्णधारपदाच्या कारकिर्दीत २०१४ ते २०२२ दरम्यान ६८ कसोटी सामन्यांचे नेतृत्व केले. ज्यात ४० सामन्यात विजय मिळवला. त्यामुळे तो भारताचा सर्वाधिक यशस्वी कसोटी कर्णधार ठरला. कोहली याने यापूर्वी २०२४ टी-२० विश्वचषकानंतर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.सध्या त्याने वन-डे क्रिकेटबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.
२००१ साली केलं पदार्पण : विराट कोहलीने जून २०११ साली किंग्स्टन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले. त्यानंतर कोहलीने पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात १५ धावा केल्या. त्याने शेवटचा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे जानेवारी २०२५ मध्ये खेळला. या शेवटच्या कसोटीत, कोहलीने पहिल्या डावात १७ धावा आणि दुसऱ्या डावात ६ धावा केल्या. विराट कोहलीचं क्रिकेट करिअर : १२३ टेस्ट, २१० इनिंग्स, ९२३० रन, ४६.८५ ॲव्हरेज, ३० शतक, ३१ अर्धशतक ३०२ वनडे, २९० इनिंग्स, १४१८१ रन, ५७.८८ ॲव्हरेज, ५१ शतक, ७४ अर्धशतक, ५ विकेट १२५ टी२० , ११७ इनिंग्स, ४१८८ रन, ४८.६९ ॲव्हरेज, १ शतक, ३८ अर्धशतक, ४ विकेट.