भाजप नेते श्याम कदम यांनी व्यक्त केल्या भावना
मुंबई : शिवसेना शाखा क्रमांक १४च्या संस्कृती तर्फे नावाप्रमाणेच ‘सामना’चे निवृत्त ज्येष्ठ पत्रकार योगेश वसंत त्रिवेदी उर्फ गुरुजी यांना मोगऱ्याच्या फुलांचे रोप देऊन सन्मानित केले. या मोगऱ्याच्या सुगंधाप्रमाणेच गुरुजींच्या परखड पत्रकारितेचा सुगंध समाजात सर्वत्र दरवळत राहो, निरोगी शतकी आयुष्य जगावेत आणि आम्हाला सदैव मार्गदर्शन मिळावे, अशा शब्दांत बोरीवली पूर्व येथील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. श्यामराव कदम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कमलाकर आणि राजेंद्र सूर्यवंशी यांच्या संपादकत्वाखाली अंबरनाथ येथून प्रसिद्ध होणाऱ्या दैनिक अंबरनाथ टाइम्स तर्फे नुकताच योगेश वसंत त्रिवेदी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यानिमित्ताने शिवसेना शाखा क्रमांक १४, गावदेवी मंडळ, वाहतूक सेना, ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने योगेश त्रिवेदी यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र पुरस्कार सन्मानित अशोक महादेव उर्फ दादासाहेब शिंदे यांच्या शुभहस्ते शाल, स्वराधीश भरत बलवल्ली लिखित ‘भरत वाक्य’ हा ग्रंथ तसेच मोगऱ्याच्या फुलांचे रोप देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी श्यामराव कदम बोलत होते. त्यांनी तसेच दादासाहेब शिंदे, वसंत तांबे, श्याम साळवी, भाविका नवलू, जयवंत मोरे, दिलीप देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रणवरे आदींनी योगेश वसंत त्रिवेदी यांच्या पत्रकारितेचा गौरव केला. सत्काराला उत्तर देतांना योगेश त्रिवेदी यांनी आपल्या अनुभवातील अनेक राजकीय आठवणी कथन केल्या. या कार्यक्रमाचे आयोजन सुत्रसंचालन श्री राजेश बागकर उपशाखा प्रमुख, तसेच दशरथ मांजरेकर संपर्क प्रमुख यांनी केले. विवेक सावंत, दिपक पाटील, लक्ष्मण मोरे, रविंद्र पवार, शतृघ्न फरांदे, रमेश रासम, दिलीप देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.