बांगलादेशमध्ये शेख हसीना यांच्या पक्षावरील बंदीच्या निर्णयावर भारताची नाराजी

0

नवी दिल्ली : बांगलादेशमधील मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकारने गेल्या काही दिवसापूर्वी शेख हसीना यांचा पक्ष अवामी लीगवर देशाच्या दहशतवादविरोधी कायद्याअंतर्गत बंदी घालण्यात आली.बांगलादेशच्या अंतरिम सरकारने घेतलेल्या या निर्णयावर आता भारताने नाराजी व्यक्त करत भूमिका स्पष्ट केली.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी रणधीर जयस्वाल यांनी बांगलादेशमधील अंतरिम सरकारने अवामी लीग पक्षावर घातलेल्या बंदीबाबत बोलताना म्हणाले की, योग्य प्रक्रिया राबल्याशिवाय अवामी लीग पक्षावर घालण्यात आलेली बंदी आणि यासंदर्भातील घटनाक्रम चिंताजनक आहे. लोकशाही देश म्हणून भारताला लोकशाहीचे स्वातंत्र्य आणि राजकीय परीघावरील येत असलेली गदा याबद्दल स्वाभाविकपणे चिंता आहे. बांगलादेशात मुक्त, निष्पक्ष आणि सर्वसमावेशक निवडणुका लवकर घेण्यास आम्ही पाठिंबा देतो, असेही रणधीर जयस्वाल यांनी म्हटले आहे.

तत्पूर्वी, मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारने दहशतवादविरोधी कायद्याअंतर्गत ‘अवामी लीग’वर बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा केली. एका निवेदनात असे म्हटले आहे की, देशाची सुरक्षितता आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याच्या हितासाठी बांगलादेश आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणात अवामी लीग आणि त्यांच्या नेत्यांविरुद्ध खटला पूर्ण होईपर्यंत ही बंदी लागू राहील.

दरम्यान, गेल्या वर्षी ५ ऑगस्ट रोजी शेख हसीना यांना बांगलादेश सोडून दुसऱ्या देशात पलायन करावे लागले होते. त्यानंतर पुढच्या काही दिवसांतच बांगलादेशात नोबेल पारितोषिक विजेते युनूस यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकार स्थापन झाले. तेव्हापासून शेख हसीना आणि अवामी लीगच्या नेत्यांवर अनेक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech