नवी दिल्ली : भारत-पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्रमंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी २०२३ मध्ये त्यांना झेड दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. भारतीय संरक्षण दलांचे ऑपरेशन सिंदूर, त्यानंतर खवळलेल्या पाकिस्तानने सीमा रेषेवर सुरू केलेल्या कुरापती आणि ड्रोन हल्ले यामुळे भारत-पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण स्थिती आहे. युद्धविरामाचा निर्णय घेण्यात आला असला तरी पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्यासाठी भारत सज्ज आहे. या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा दलांनी नुकताच देशातील महत्त्वाच्या आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचा आढावा घेतला. दहशतवादी हल्ल्याचा धोका असलेल्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेबाबत यात निर्णय घेण्यात आला. गृहमंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एस. जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांना बुलेटप्रुफ कार देण्यात आली असून निवासस्थानाबाहेरील सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. जयशंकर यांना आधीपासूनच झेड दर्जाची सुरक्षा आहे. सीआरपीएफचे ३० पेक्षा जास्त जवान त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असतात.