नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याचे पडघम वाजायला लागले आहेत. ज्या गोदाघाटावर दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो तो गोदाघाट गेल्या ५० वर्षात कसा बदलत गेला हे चित्रकार रामदास महाले यांनी चित्रबद्ध केले आहे. गोदाघाटाची ही स्थित्यंतरे नाशिककर रसिकांना बघता येणार आहेत. दि.१६ रोजी इंदिरानगर येथील बापू बंगल्याजवळ सर्वात्मक वाचनालयाच्या कलादालनात सायंकाळी ५ वाजता प्रदर्शनाला प्रारंभ होईल.
देश, परदेशातील अनेक चित्रकारांना नाशिकच्या गोदाघाटाने भुरळ घातली. अशा गोदावरी नदीच्या घाटासह नाशिक परिसर तसेच त्र्यंबकेश्वर व इतर सौंदर्यस्थळे चित्रित करण्यात आली आहेत. त्यापैकी सुमारे ५० चित्रे प्रदर्शित करण्यात येतील. ज्येष्ठ चित्रकार केशव मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक कलानिकेतनचे सचिव व चित्रकार दिनकर जानमाळी यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येईल.
चित्रकार रामदास महाले उत्तम कलाशिक्षक म्हणून ख्यातनाम आहेत. त्यांना आदर्श कलाशिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. त्यांची मुंबईतील जहाँगीर आर्ट गॅलरीत तसेच पुण्याच्या बालगंधर्व कलादालनासह विविध ठिकाणी कला प्रदर्शने झाली आहेत. अनेक पारितोषिके व सन्मान त्यांना मिळाले आहेत. प्रस्तुत प्रदर्शन दि.२० पर्यंत दररोज सकाळी ९ ते २ व सायंकाळी ५ ते ८ विनामूल्य खुले राहील. नाशिककर रसिकांनी भेट देऊन चित्रांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.