मुंबई : भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटर गौतम गंभीर याने गुरुवारी( दि. १५) पत्नी नताशा जैनसह मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात भेट दिली.यावेळी दोघांनी जोडीनं मंदिरात पूजाही केल्याचं पाहायला मिळत आहे. आयपीएलची सांगता होताच भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या महत्त्वपूर्ण आणि आव्हानात्मक दौऱ्याआधी भारतीय संघाचा कोच गौतम गंभीर मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी गेल्याचे पाहायला मिळाले. कोचच्या रुपात नव्या टीम इंडियाची आस असणाऱ्या गौतम गंभीर याने आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून सिद्धिविनायक मंदिरातील पत्नीसोबतचे खास फोटो शेअर केले आहेत.यातील एका फोटोमध्ये दोघेही हात जोडून मंदिरात प्रार्थना करत असल्याचे दिसून येते. याशिवाय दुसऱ्या फोटोत या जोडीनं मंदिरात केलेल्या पूजेची झलक पाहायला मिळते. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत आहेत.
गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाला कसोटीत धमक दाखवता आलेली नाही. घरच्या मैदानात भारतीय संघाला आधी न्यूझीलंड विरुद्धच्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत व्हाइट वॉशची नामुष्की ओढावली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही भारतीय संघानला ३-१ अशा पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळेच इंग्लंड दौरा हा गंभीरसाठीही चॅलेंजिंग असेल. विराट कोहली अन् रोहित शर्मा यांनी कसोटीतून निवृत्ती घेतल्यावर भारतीय कसोटीत गंभीर पर्व सुरु झाल्याची चर्चाही रंगताना दिसते. त्याच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया इंग्लंडमध्ये इतिहास रचणार का? ते पाहण्याजोगे असेल.