मुंबई : मागील ४८ तासांपासून देशभरात हवामानात मोठे बदल जाणवत असून, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातही हवामान अस्थिर झाले आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यासाठी १८ मेपर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाने केले आहे.
मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह पावसाचा जोर दिसत आहे. यंदाचा मे महिना उन्हाचा नव्हे तर पावसाचा ठरत आहे. पुढील तीन ते चार आठवडे राज्यात सरासरीहून अधिक पावसाचे संकेत देण्यात आले आहेत. सातारा, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, यवतमाळ, चंद्रपूर आदी जिल्ह्यांत वळवाच्या पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. नागरिकांना हवामान विभागाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.