चंदीगड : हरियाणाच्या कैथलमध्ये एका पाकिस्तानी गुप्तहेरला पकडण्यात आले. कैथलच्या मस्तगढ चिका गावातून या गुप्तहेराला अटक करण्यात आली असून देवेंद्र सिंह असे त्याचे नाव आहे. आरोपीने ऑपरेशन सिंदूर बाबत पाकिस्तानला माहिती पुरवल्याचे त्याने कबुल केले आहे. याबाबत कैथलचे डीएसपी वीरभान यांनी सांगितले की, गुप्त माहितीच्या आधारे आम्ही विशेष पथक तयार करून देवेंद्र सिंह याला ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात त्याने ऑपरेशन सिंदूरविषयीची माहिती पाकिस्तानला दिल्याचे उघड झाले आहे. देवेंद्रकडून जप्त केलेल्या मोबाईल, लॅपटॉप आणि इतर डिजिटल उपकरणांची सायबर पोलिसांचे पथक चौकशी करत आहे. मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
देवेंद्र सिंह हा पंजाबमधील एका महाविद्यालयात एमए-पॉलिटिकल सायन्सचा विद्यार्थी होता. नोव्हेंबर तो २०२४ मध्ये पाकिस्तानच्या नानकाना साहिब गुरुद्वारला गेला होता, त्यावेळी त्याची पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या एजंटांसोबत ओळख झाली. तेव्हापासून तो त्यांच्या संपर्कात होता. हरियाणा आणि पंजाबमधून पाकिस्तानला माहिती पुरवण्याचे प्रकार वाढत असताना ही घटना उघडकीस आली आहे. यापूर्वी, नौमन इलाही याला हरियाणाच्या पानिपत येथे पाकिस्तानला संवेदनशील माहिती पाठवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. अमृतसरमधील लष्करी आस्थापनांची माहिती पाकिस्तानला पाठवल्याच्या आरोपाखाली पंजाब पोलिसांनी पलक शेर मसीह आणि सूरज मसीह यांनाही अटक केली होती.