ठाणे : खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नाने आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गांधीनगर कोपरी (पूर्व) येथे साकार झालेत्या श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर परिसरात अद्ययावत, एकमजली वातानुकूलित सभागृह बांधण्यात आले असून या सभागृहाचे उद्घाटन सौ. लताताई एकनाथजी शिंदे यांच्या शुभ हस्ते उत्साहात पार पडले.
प्रारंभी सौ. लताताई शिंदे यांचे शिवसेना शाखेपासून मिरवणुकीने जोरदार स्वागत स्थानिक महिला मंडळ आणि रहिवाश्यांनी केले. मिरवणुकीने त्यांना सभागृहापर्यंत नेण्यात आले. विठ्ठल-रखुमाई मंदिरात त्यांनी दर्शन घेतल्याने सदर सभागृहाचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी आशुतोष नरेश म्हस्के यांच्या पुढाकाराने शिवसेना शाखा गांधीनगर, विठ्ठल-रखुमाई मंदिर समिती आणि हनुमान मंदिर समिती व शिवसम्राट मित्र मंडळ आणि गांधीनगरचे पंच मंडळी यांच्या वतीने सौ. लताताई शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
ग्रामस्थांच्या वतीने शाखाप्रमुख विजय पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के आणि आशुतोष म्हस्के यांचे आभार मानले. गांधीनगर लेप्रसी कॉलनीकरिता तसेच लेप्रसी बांधव आणि भगिनींकरिता धर्मवीर आनंद दिघे साहेबांनंतर एकनाथ शिंदे साहेब आणि खासदार नरेश म्हस्के हे लक्ष देत आहेत त्याच्याबद्दल त्यांनी गावकऱयांच्या वतीने आभार मानले.
गांधीनगर मधील रहिवासी हे कायम आमच्या सोबत आहेत तसेच शिंदे साहेबांनी भूमिका घेतल्यानंतर १०० टक्के गाव आणि १०० टक्के शिवसैनिक आमच्यासोबत राहिल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी ग्रामस्थांचे आभार मानले. माझ्या सुरुवातीच्या काळापासून हे ग्रामस्थ माझ्या सोबत आहेत आणि मी जे काही काम करू शकलो तो एकनाथ शिंदे साहेबांचा भरभक्कम पाठिंबा माझ्या पाठीशी आहे त्यामुळेच शक्य झाल्याचे खासदार नरेश म्हस्के यावेळी म्हणाले.
एकनाथ शिंदे साहेब आणि सौ. लताताई शिंदे उभयता कार्यकर्त्यांवरती जातीने लक्ष देतात. एकनाथ शिंदे साहेब हे वर्षभर रात्रंदिवस काम करतात परंतु शिवसैनिकांवरती मनापासून माया करण्याचे काम, शिवसैनिकांना मदत करण्याचे काम सौ. लताताई शिंदे ह्या सुद्धा करत असतात. त्या आपल्या रुक्मिणीच आहेत, रुक्मिणीप्रमाणे माया त्यांनी सर्व शिवसैनिकांना लावलेली आहे असे गौरवोद्गार काढून खासदार नरेश म्हस्के यांनी त्यांचे कौतुक केले.
सौ. लताताई शिंदे यांनी संपूर्णपणे एकमजली वातानुकूलित हॉल पाहून कौतुक केले आणि नागरिक कायम शिवसेनेसोबत असल्याबद्दल त्यांचे आभार मानले. या कार्यक्रमाला महिला आघाडी शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख मिनाक्षी शिंदे, माजी नगरसेविका मिनल संखे, नम्रता भोसले-जाधव, सुचित्रा काळे, रिना मुदलीयार, रुपाली रेपाळे आदी मान्यवर उपस्थित होते.